Share

“पाच वर्षे चेअरमन मीच होणार”; माळेगाव विजयानंतर अजित पवारांची तुफानी फटकेबाजी

Ajit Pawar declares himself Malegaon Sugar Mill Chairman after panel’s win.

Published On: 

Ajit Pawar declares himself Malegaon Sugar Mill Chairman after panel's win.

🕒 1 min read

बारामती: राज्यात गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) ‘निलकंठेश्वर पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवला आहे. २१ पैकी २० जागा जिंकत अजित पवारच कारखान्याचे चेअरमन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या आभार मेळाव्यात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी करत, निवडणुकीदरम्यानच्या पडद्यामागील अनेक गोष्टी आणि किस्से उघड केले, तसेच विरोधकांवर आणि क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवरही तोफ डागली.

यावेळी बोलताना अजित पवारांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. ते ( Ajit Pawar ) म्हणाले, “मी ही निवडणूक जुळवून घेण्याचा विचार करत होतो. मुख्यमंत्र्यांशी (देवेंद्र फडणवीस) माझं तसं बोलणंही सुरू होतं. त्यांनी मला राज्यात आणि केंद्रात आपण एकत्र आहोत, मग माळेगावमध्ये का मार्ग काढत नाही, थोडं पुढं-मागे सरका, १०-१० आणि २१वा मी, असंही सुचवलं होतं. मुख्यमंत्री तर अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबद्दलही बोलले होते.”

Ajit Pawar to be Malegaon Sugar Mill Chairman

मात्र, “मी काही बोललो नाही. म्हणालो, तुम्ही सांगा. मग त्यांनी चर्चा केली आणि त्यांना कुणीतरी सांगितले की ‘हवा आपली’. त्यामुळे सगळं इथंच फिस्कटलं,” असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता चंद्रराव तावरे यांच्यावर जोरदार टीका केली. हा किस्सा त्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान घडल्याची माहिती दिली.

या विजयाने अजित पवारांचे बारामतीवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. “कारखान्याची निवडणूक याआधी कधीही इतक्या गंभीरपणे मी घेतली नव्हती. मला गरज होती, म्हणून मला जो सांगेल त्याच्या घरी गेलो. यात माझी किती बदनामी केली, खासगीकरण करणार असे बोलले गेले,” असे म्हणत त्यांनी प्रचारादरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.

पॅनेल निवडून आले असले तरी, काही ठिकाणी झालेल्या क्रॉस व्होटिंगवरूनही अजित पवारांनी सभासदांना इशारा दिला. “क्रॉस व्होटिंग कुठं झालं, त्याचे आकडे माझ्याकडे आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, निवडणुकीतील उमेदवारांच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “मी १९९१ साली कारखान्याच्या निवडणुकीसाठी उभा होतो, त्यानंतर मी ९५, ९९ ला स्वतः मतमोजणीला उपस्थित होतो. आपले उमेदवार मतमोजणीला कुठे होते? उमेदवार होते कुठं? असं कसं तुम्ही करू शकता? हे बरोबर नाही,” असे म्हणत त्यांनी ( Ajit Pawar ) काही उमेदवारांवर आपला संताप बोलून दाखवला.

अजित पवार इथेच थांबले नाहीत. निवडून आलेल्या सदस्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत ‘दम’ दिला. “पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही बोलले गेले, पण तिथं काहीही झालं नव्हतं. रामराजे, संजीवराजे नाईक निंबाळकर (शरद पवार गट), माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी मदत केली.”

“आता, कारखाना निवडणुकीत निवडून आलेल्या २१ च्या २१ लोकांनी येऊन बसावं, सगळ्यांना सन्मानाने वागवले जाईल. तुम्ही सगळे सभासद या कारखान्याचे चेअरमन आहात. माझ्या नावाचा वापर केला आणि चुकीचे काही केले तर हे मला चालणार नाही,” अशा शब्दात त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना नैतिकतेचा धडा दिला.

कारखान्याच्या कारभाराबाबतही अजित पवारांनी महत्त्वाचे संकेत दिले. “इथे ठराविक लोकांना टेंडर दिली जातात असे कळले आहे, हे चालणार नाही. डायरेक्टरच्या घरी व्यापारी गेला तर त्याला सांगा, संचालक मिटिंगमध्ये मांड. आपल्याला पारदर्शक कारभार करायचा आहे. कामगाराने जर चुकीचे काम केले आणि समजले तर त्याची खैर नाही.”

ऊस दराबाबत बोलताना ते म्हणाले, “माझा कारखाना जसा तोडणी वाहतूक करतो, तसे छत्रपती, माळेगाव, सोमेश्वरला मी करणार आहे. माझ्या ७० एकरावर ठिबकचे काम करतो आहे, ३ वर्षाने बेणे बदलले पाहिजे. मी चेअरमन होणार म्हटल्यावर मला जास्त द्यावंच लागणार.”

यावेळी त्यांनी ५ वर्षे स्वतःच चेअरमन राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. “पाच वर्षे चेअरमन मीच होणार, कुणाच्या डोक्यात काही असेल तर काढून टाका, उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नका. अनेकांनी माझ्यावर टीका केली, मला नाइलाजास्तव, पॅनल निवडून आणण्यासाठी, पुढाऱ्यांनी इकडे तिकडे केले असले तरी सभासदांनी विश्वास ठेवला, म्हणून चेअरमनपदाची जबाबदारी मी घेतली आहे,” असेही अजित पवारांनी ( Ajit Pawar ) नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, मिरवणूक काढण्यावरून अजित पवारांनी सर्वांचेच कान टोचले. “कारखान्यात आता कामच करायचं, काम करायचं नसेल तर राजीनामा द्या आणि फिरा. एकदा सही केली त्याने कामच करायचे, जे लोकं निवडून आले त्यांनी मी सांगेल तसेच वागायचं. लोकांशी नीट बोललं तर लोकं मत देतात. काही लोकांनी आत्मचिंतन करावे, लोकांनी आपल्याला का नाकारले,” असे म्हणत अजित पवारांनी पराभूत झालेल्या स्वतः च्याच उमेदवारांना टोला लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Agriculture Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या