🕒 1 min read
अहमदाबाद: १२ जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाला भीषण अपघात होऊन २७० हून अधिक लोकांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाच्या (Air India) विमानतळ सेवा व्यवस्थापन कंपनीच्या (AISATS) कार्यालयात कर्मचाऱ्यांनी पार्टी केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर, AISATS कंपनीने तातडीने कठोर कारवाई केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एअर इंडिया सॅट्स (AISATS) या कंपनीचे कर्मचारी कार्यालयात नाचगाणे करत जल्लोष करताना दिसत आहेत. AISATS ही टाटा समूह आणि सिंगापूर स्टॅट्स लिमिटेड यांचा ५०-५० टक्के भागीदारी असलेला एक संयुक्त उपक्रम आहे. ही पार्टी गुरुग्राम येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या तारखेचा आहे, हे कंपनीने स्पष्ट केले नसले तरी, १२ जूनच्या अपघातानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ही पार्टी झाल्याचा दावा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
Air India staff partied after plane crash
या घटनेवर AISATS च्या प्रवक्त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे. “एअर इंडियाचे ( Air India ) विमान एआय-१७१ च्या दुर्दैवी अपघातात बाधित झालेल्या कुटुंबीयांप्रती एअर इंडिया समूह संवेदना व्यक्त करत आहे. आमच्या कार्यालयातील व्हायरल व्हिडीओबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
प्रवक्त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “कर्मचाऱ्यांचे हे वर्तन कंपनीच्या मूल्यांशी जुळणारे नव्हते. त्यामुळे आम्ही या प्रकरणी शिस्तभंगाची कठोर कारवाई करत आहोत. या पार्टीला जे लोक जबाबदार होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यात चार वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले असून, इतर संबंधित कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली आहे.”
१२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच एआय-१७१ विमान कोसळले. या अपघातात विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ज्या ठिकाणी विमान कोसळले, तेथील ३० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. अशा गंभीर घटनेनंतर कार्यालयात अशा प्रकारची पार्टी झाल्याने एअर इंडिया आणि AISATS वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- इराणची इस्रायलवर जहरी टीका: ‘डॅडीकडे मदत मागण्याशिवाय पर्याय नव्हता’; ट्रम्प यांच्याबाबतही टिप्पणी
- ‘कांटा लगा’ फेम शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- हिंदी सक्तीविरोधात ठाकरे-मनसेच्या मोर्चात राष्ट्रवादी उतरणार; Supriya Sule यांनी स्पष्ट केली भूमिका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












