Aaditya Thackeray | “मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं हे आज दिसलं”; अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर आगपाखड

Aaditya Thackeray | मुंबई : आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala sitaraman) यांनी जाहीर केला, त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करण्यात आलं आहे’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

“महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”

“केंद्रीय अर्थसंकल्पातून काय मिळालं? हा मोठा सवाल आहे. ज्या राज्यात आताच निवडणुका होऊन गेल्या. जिथे भाजपने 150 हून अधिक जागा जिंकल्या. त्या राज्यात महाराष्ट्रातून वेदान्त फॉक्सकॉन, टाटा एअरबस, फायनान्शिअल सेंटर आदि कंपन्या गेल्या. त्यांना अधिकच्या सवलतीही मिळाल्या आहेत. मला वाटतं डायमंड हबही सुरतला गेलं आहे. पण या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम झालं आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं”

“त्याचबरोबर कर्नाटकात निवडणुका येऊ घातल्या आहेत. तिथे भाजपाला कदाचित कमी जागा येतील, असं एक्झिट पोलमध्ये दिसलं असावं. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात त्या राज्यासाठी खर्च दाखवला आहे. पण राष्ट्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईचा कुठेही उल्लेख झाला नाही. मूळ मुद्दा हाच आहे की, राज्यात एवढी ओढाताण करून घटनाबाह्य सरकार स्थापन केलं. तरीही महाराष्ट्राला आणि मुंबईला कुठेतरी दिल्लीसमोर झुकवायचं आणि काहीच द्यायचं नाही, हे आजच्या अर्थसंकल्पात दिसलं,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

विनायक राऊतांची टीका

“हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात सवलती देण्याचा प्रयत्न केला असला तरी एक घोर निराशा खासकरून मुंबईकरांच्या पदरी आली आहे. मुंबईत सातत्याने पंतप्रधान मोदी यांचं येणं-जाणं वाढलं असल्यामुळे मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल, असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करताना शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याचं यापूर्वी सूचित केलं होतं. शेतकऱ्यांच्या दुप्पट झालेल्या उत्पन्नाला योग्य तो बाजारभाव देण्यासाठी ठोस उपाय योजना करायला हवी होती, ती केली गेली नाही.”, अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button