देशातील एका मोठ्या केंद्रीय मंत्र्याला ज्या तरुणाईच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला, त्याच तरुणाईला अचानक कोणी ‘गटर जनरेशन’ कसं काय म्हणू शकतं? सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात याच प्रश्नावरून मोठी खळबळ उडाली आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखालील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना नुकताच राजीनामा द्यावा लागला. याच आंदोलनात सहभागी झालेल्या ‘जेन झी’ (Gen Z) तरुणाईवर आता भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवरून त्यांनी जंतरमंतरवरील या आंदोलकांच्या भाषेवर आणि वर्तणुकीवर थेट ताशेरे ओढले आहेत.
Kangana Ranaut on Gen Z
कंगना रणौत यांनी इन्स्टाग्रामवर आपला संताप व्यक्त करताना या नव्या पिढीला थेट ‘गटर जनरेशन’ म्हटलं आहे. आंदोलनातील व्हिडिओ आणि रिल्स पाहून मला किळस येते, अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला. “मी माझ्या आयुष्यात एकाच ठिकाणी इतका घाणेरडा प्रकार कधीच पाहिला नाही. जेन झी ज्या भाषेचा वापर करत आहेत, ते ऐकूनच धक्का बसतो. यांना जन्म कोण देतं आणि वाढवतं कोण?” असा जळजळीत सवाल कंगना यांनी विचारला आहे.
दुसरीकडे, आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण महिलांवरही त्यांनी निशाणा साधला. आजची पिढी पाश्चिमात्य संस्कृतीने प्रेरित असून, नशेच्या आहारी जाणे, दारू पिणे आणि अनेक लैंगिक संबंध ठेवण्यावर या लोकांना अभिमान वाटतो, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. स्वतःला कॉकरोच म्हणवून घेणारे हे लोक खरोखरच तसेच वागत आहेत. आंदोलनानंतर जंतरमंतरवर ६० मेट्रिक टन कचरा या लोकांनी फेकून दिला, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकारानंतर आपल्याला ‘डिजिटल डिटॉक्स’ची गरज असल्याचं कंगना यांनी नमूद केलं आहे.
दरम्यान, नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणानंतर सुरू झालेल्या सीजेपीच्या या ३६ दिवसीय आंदोलनाची जगभरात चर्चा झाली. याच वाढत्या दबावामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. त्यामुळेच आता कंगना यांच्या या स्फोटक विधानांवर तरुणाईकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- CJP पुन्हा रणांगणात! अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा; देशभर आंदोलनाचा एल्गार
- ‘अरे राहुल, माझं ऐक!’ लोकसभेत श्रीकांत शिंदेंचा टोला; NEET परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची मागणी
- तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने निलंबित













