Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! पुढील पाच दिवस वाढणार उन्हाचा तडाखा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: अवकाळी पाऊस थांबल्यानंतर राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील तापमान वाढत चालले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. अशात पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील पाच दिवस राज्याच्या तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या पाच दिवसांमध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताने आजारी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने करण्यात येत आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावर्षीचा उन्हाळा अधिक धोकादायक असल्याचा हवामान खात्याने म्हटलं आहे. यंदा राज्यात उष्माघाताचे तब्बल 1477 रुग्ण आढळले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे.

मुंबई, पुण्यासाह राज्यात उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. वाढती उष्णता आणि सातत्याने उन्हामध्ये काम केल्याने शरीराचं  प्रचंड डीहायड्रेशन होतं. परिणामी रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून तीव्र झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून या कडक उन्हात घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेणे खूप आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या