Weather Update | पुढील तीन दिवस वाढणार उन्हाच्या झळा, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रासह देशातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर उष्माघाताशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. त्याचबरोबर अमरावती, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागामध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार होता.

गेल्या काही दिवसापासून राज्यासह देशात कडक ऊन पडतं आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक हैराण होत चालले आहे. देशातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशापार पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन सातत्याने हवामान खात्याकडून केले जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (20 मे) दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज आहे. तर राजस्थानमधील काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पार राहणार असल्याचा अंदाज आहे. जयपुर, भरतपूर, दोसा या जिल्ह्यांमध्ये जोरदार उष्ण वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.