Weather Update | राज्यात थंडीचा जोर ओसरणार, किमान तापमानात होणार वाढ

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा (Cold) कायम आहे. या भागात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. अशात येत्या दोन दिवसात या ठिकाणी किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातही थंडी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मात्र, आज (24 जानेवारी) उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी सोमवारी (23 जानेवारी) 8.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर, धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा 11 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. अशा परिस्थितीत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 29 ते 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवण्यात आला आहे. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी 33 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात देशासह राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरली होती. या वाढत्या थंडीचा जनसामान्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून आला होता. त्याचबरोबर या कडाक्याच्या थंडीमुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला होता. थंडीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

महत्वाच्या बातम्या

Back to top button