Uddhav Thackeray Shivsena | उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील ‘त्या’ आश्रमात जाणं टाळलं?; अनेक चर्चांना उधाण

Shivsena | मुंबई : शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाण्यामध्ये गेले होते. ठाण्यातील आरोग्य शिबीरात त्यांची उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी भाषणही केले. ‘माझ्यासोबत जे राहिले आहेत ते अस्सल कडवट शिवसैनिक बाकी विकाऊ विकले गेले’, असं म्हणत त्यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला. मात्र ‘आनंद आश्रम’ या ठिकाणी जाणे त्यांनी टाळले. यावरुन उद्धव ठाकरेंनी असं का केलं? याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या टेंभी नाका या ठिकाणी ‘आनंद आश्रम’ आहे. आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार होते त्याआधी आज सकाळी या आनंद आश्रमावर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक उभारण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणे टाळले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा फलक लागला तेव्हापासूनच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार नाहीत, अशी चर्चा देखील सुरू होती.

ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे वास्तव्यास होते. याच आश्रमातून आनंद दिघे पक्षाचा कारभार करत असत. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक या आश्रमात येऊ लागले. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आणि शिवसेनेत ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असे दोन गट पडल्यानंतर आनंद आश्रमात कोण जाणार? यावरून दोन्ही गटांमध्ये धुसफूस सुरू होती. त्यानंतर काही दिवस दोन्ही गट आनंद आश्रम या ठिकाणी जात होते. मात्र आज सकाळीच या आनंद आश्रम या जागेवर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक लावण्यात आला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे ठाण्यात येणार म्हणून तो फलक लावला गेला का? किंवा उद्धव ठाकरेंनी मुद्दामच जाणं टाळलं याबाबत संभ्रम आहे. याबाबत अद्याप कोणाकडून स्पष्टोक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत.

महत्वाच्या बातम्या