नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरू असतानाच, परिवहन आणि रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “आता मी जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला संधी दिली पाहिजे,” असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे.
नागपूरमधील (Nagpur) काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग’ या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Nitin Gadkari gives retirement hint
शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी आयोजित एका प्रशिक्षण सत्राला संबोधित करताना गडकरी यांनी विद्यार्थी व शिक्षकांना उत्तम आरोग्य राखण्याचा सल्ला दिला. त्यांनी नमूद केले की आपणही दररोज अडीच तास योगासन करतो. विद्यार्थ्यांनीही योगासने करावीत आणि समाधानकारक जीवन जगावे, असे गडकरी यांनी सांगितले.
पुढे संबोधित करताना ते म्हणाले की, “तरुणपणी पक्षासाठी काम करताना वेळकाळ न बघता परिश्रम घेतले. समोसा खाऊन झोपी जायचो, पण कोरोनानंतर शिस्तीत आलो. आता दररोज योगा करतो. यामुळे तब्येत चांगली आहे. तब्येत चांगली असेल तर आनंद घेता येईल. तब्येत चांगली नसेल तर सत्ता काही कामाची नाही. मात्र, आता मी जास्त काम करू शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीला संधी दिली पाहिजे.”
गडकरी यांनी नवीन पिढीला प्रोत्साहन देताना हे विधान केले असले तरी, स्वतःबद्दल केलेल्या त्या टिप्पणीमुळे ते निवृत्तीचे संकेत देत असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लता मंगेशकर विद्यापीठाला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
- ‘देशात साखर घोटाळा’; वाढत्या दरांवर राजू शेट्टींचा गंभीर आरोप
- 3 नवजातांचा मृत्यू; ‘दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा’, बावनकुळेंचा इशारा












