Sanjay Raut । नवी दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
“एकनाथ शिंदे यांनी राज्याला केवळ प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर राज्याच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम केले”, अशा शब्दात शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे. तर एकनाथ शिंदेंनीही पवारांची स्तुती केली आहे.
“हा पुरस्कार सदू शिंदे यांच्या जावयाच्या हातून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत मिळणे मोठा योगायोग आहे. शरद पवार हे फिरकीपटू सदू शिंदे यांचे जावई होत. पवार साहेब अशी गुगली टाकतात की ती कधीच कोणाच्या लक्षात येत नाही. पण त्यांनी माझ्यावर कधीच गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत,” अशी खात्री शिंदे यांनी व्यक्त केली.
परंतु यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर (Sanjay Raut vs Sharad Pawar) निशाणा साधला आहे. “शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नाही तर अमित शहांचा (Amit Shah) सत्कार केला आहे. कारण शिंदेंचा पक्ष हा शहांचा पक्ष आहे. शहांच्या सहकार्यानं त्यांनी राज्याचे तुकडे केले. आम्हालाही राजकारण कळतं पवारसाहेब,” असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.
“शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जायला नको होते. राजकारणामध्ये काही गोष्टी टाळायच्या असतात. शिंदे हे अमित शहांचे प्रतिक असून ज्यांनी महाराष्ट्र राज्याला कमजोर केले त्यांना सन्मानित का करता? या सत्कारामुळे आम्हाला खूप वेदना झाल्या आहेत,” असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
Sanjay Raut on Sharad Pawar
दरम्यान, शिंदेंच्या सत्कारामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळते. अशातच संजय राऊत यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर शरद पवार काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :