Sanjay Raut । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. यावरून शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी टीका केली होती.
याच पुरस्कारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोकांचा गैरसमज झाला की, मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला आहे. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची फसवणूक झाली आहे. हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम नसून खाजगी कार्यक्रम होता,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
“ज्या व्यक्तीला महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, त्यांनी असं कुठलं महान काम केलं आहे? महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला मराठी साहित्य परिषदेची परवानगी घेतली नव्हती,” असा दावाही राऊत यांनी यावेळी केला.
“शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तीला अंधारात ठेवले गेले. आमचं एखाद्या व्यक्ती विषयीचे मत टोकाचं असून शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा आमचं तेच मत आहे. आमचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फोडला,” असा घणाघात देखील संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, संजय राऊत यांच्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. यावर एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तसेच दिल्लीत आज पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार आहेत. हे दोन्ही नेते यादरम्यान काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या