Ajit Pawar | “अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा”; राष्ट्रवादी आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Breaking | मुंबई : शिवसेना-भाजप ही 25 वर्षांची युती 2019मध्ये तुटली आणि राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

सेना-भाजपची युती तुटली

सेना-भाजपमधील युती तुटण्याचं एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून झालेला वाद. भाजप आणि शिवसेनेचा अडिच-अडिच वर्ष मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचं सेनेकडून सांगण्यात आलं, मात्र असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपने सांगितलं. त्यावरुन सेना-भाजपमध्ये मोठा वाद झाला.  आता महाविकास आघाडीचे पुढच्या वर्षाच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कोण? यावरुन आता पुन्हा चर्चा रंगली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

“अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा” ( Ajit Pawar Next Chief Minister – Nilesh Lanke )

जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार निलेश लंके यांनी ‘राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा”, असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत मविआतील तिनही पक्षांनी विधानसभा निवडणुका सोबतच लढण्याच्या आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ठरू शकतात.

“विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचं” 

“आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय. फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचं काम येत्या वर्षभरात करायचं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचं आहे. मी तर बऱ्याच भाषणांत सांगतो, की अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य 25 वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आहे”, असं आमदार निलेश लंके म्हणाले आहेत.

बंडखोरी आणि सत्ताबदल

राज्याच्या राजकारणात 4 वर्षापूर्वी अनेक नाट्यमय प्रकारे निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापन झाली. त्याचबरोबर आता गेल्या 6 महिन्यापूर्वी देखील राज्यात अशाच प्रकारे नाट्यमय घडामोडी रंगून सत्ताबदल झाला. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षातील तब्बल 40 आमदार आणि 13 खासदार आपल्यासोबत बाहेर काढले आणि शिवसेनेचाच वेगळा गट तयार केला. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापनेचा दावाही केला. तेव्हाही आधी मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा झाल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.