🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर- गेल्या दीड वर्षात तब्बल ५०१ दुचाकीस्वारांनी रस्त्यावर अपघातात जीव गमावला आहे. मृत्यूचा हाच वाढता आलेख आणि रस्त्यावरील बेदरकारपणा रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने थेट रस्त्यावर उतरून मोठी कारवाई (Traffic Police Fine) केली आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशानुसार ८ जूनला संपूर्ण जिल्ह्यात एक विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबवली गेली. या अंतर्गत एकाच दिवसात तब्बल ११४९ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत पोलिसांनी थेट १३ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांची आकडेवारी समोर आल्यावर पोलीस अधीक्षक जाधव यांनी स्वतः याचा सखोल आढावा घेतला. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये तब्बल ८४६ रस्ते अपघात झाले ज्यात ५३८ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी ते मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांत ३९८ अपघातांची नोंद झाली आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, यातील बहुतांश मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे आणि डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे झाले आहेत.
त्यामुळेच या मोहिमेत हेल्मेट नसणाऱ्यांवर सर्वात जास्त फोकस होता. अधिकृत माहितीनुसार, ५६३ केसेस केवळ विना हेल्मेटच्या करण्यात आल्या. त्याखालोखाल सिग्नल तोडणे (१३२), विना लायसन्स (८९) आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या (६१) कारवायांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, ट्रिपल सीट फिरणारे, ओव्हर स्पीडिंग, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे आणि १८ वर्षांखालील मुलांच्या हाती गाडी देणाऱ्यांनाही पोलिसांनी या मोहिमेत रडारवर घेतले होते. जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेने एकत्र येत ही मोहीम फत्ते केली.
या कारवाईबाबत बोलताना पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले की, “नागरिकांचे प्राण वाचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. हेल्मेट हे दंडापासून वाचण्याचे साधन नसून तुमच्या जीवाचे कवच आहे.” वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
- छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; नाशिकमध्ये ‘साहेब निर्णय घ्या’ पोस्टर्स झळकल्याने राजकारण तापलं
- विधान परिषदेत घोडेबाजार? सुप्रिया सुळेंच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












