🕒 1 min read
परळी (Parli Crime) – राजकारण्यांच्या आश्रयाने गुन्हेगारांना खरंच कायद्याचा धाक उरला नाहीये का? बीड जिल्ह्यातील परळीत सध्या घडणाऱ्या घटना पाहिल्या, तर हा प्रश्न कुणालाही पडेल. एकाच दिवशी हादरवून सोडणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
चांदापूर रोडवर भरदिवसा एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. अभिजीत कांबळे नावाचा तरुण एका हॉटेलवर चहा पीत असताना त्याला गाठण्यात आलं. त्यानंतर लोखंडी रॉड आणि कोयत्याने त्याच्यावर सपासप वार झाले. पण यात सर्वात भयानक बाब म्हणजे, या हल्ल्याचा मास्टरमाइंड एक नगरसेवक असल्याचा आरोप होतोय. हल्ल्यात अभिजीतचे दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
परळीत गुन्हेगारीचा आलेख वाढतोय? ‘डी कंपनी’च्या नावाने दहशत
पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अजित पवार गटाचा नगरसेवक नितीन रोडे याने व्हिडिओ कॉलवरून हल्लेखोरांना थेट आदेश दिला. ‘पायावर मारू नका, मुंडक्यावर मारा… आणि ते मुंडकं माझ्याकडे घेऊन या’, असं रोडे म्हणाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोडे हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक मानला जातो. परळीत ‘डी कंपनी’ आणि ‘मित्रपरिवार’ या दोन ग्रुप्सच्या माध्यमातून त्याची मोठी दहशत असल्याची परिसरात चर्चा आहे. अभिजीतवर सध्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रोडेसह आनंद कांबळे, सुरेश चौंडे आणि इतर साथीदारांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरीकडे, याच शहरात शासकीय कर्मचाऱ्यांनाही टार्गेट केलं जातंय. पेठ मोहल्ला भागात मतदान नोंदणीचं काम करणाऱ्या एका बीएलओला (BLO) चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ‘मतदानाचे फॉर्म घेऊन आमच्या घरी का आला नाहीस?’, असा जाब विचारत महफूज जाकीर शेख या शिक्षकावर चौघांनी हल्ला केला.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून शाकीर शेख, जुनेद शेख, शोएब शेख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. एकीकडे राजकीय वैमनस्यातून तरुणाच्या जीवावर उठलेले गुंड, तर दुसरीकडे थेट कर्मचाऱ्यांना घरात घुसून धमकावणारी प्रवृत्ती. त्यामुळे परळी पोलिसांसमोर आता या वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Facebook Down: अचानक फेसबुक अकाऊंट्स का झाली बंद? जगभरात गोंधळ
- न्यायालयाकडून मराठा आंदोलकांना जामीन; पण ८१ गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार का?
- तब्बल १५ वर्षांचा संसार मोडला; आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाची एकूण संपत्ती किती?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












