🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त विधानांनी गाजला. याच मुद्द्यावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला आणि काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही,” या नाना पटोलेंनी केलेल्या विधानामुळे सभागृहातील वातावरण तापले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षातील आमदारांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरू केली. नाना पटोले हे तर थेट विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन राहुल नार्वेकर यांना जाब विचारू लागले. गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री कोकाटे आणि आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेली विधाने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. याच विधानांचा संदर्भ देत पटोलेंनी (Nana Patole) सभागृहात संताप व्यक्त केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल सभागृहात माफी मागावी, अशी मागणी केली.
Nana Patole Suspended from Maharashtra Assembly
नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत, “बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहेत. हा अपमान अन्नदाता सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही,” असे खडे बोल सुनावले.
या असंसदीय शब्दांच्या वापरामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पटोले शांत झाले नाहीत आणि अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन तावातावाने बोलू लागले. यामुळे अध्यक्षांनी तात्पुरते ५ मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी “माफी मागा, माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा,” अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
नाना पटोले हे अध्यक्षांच्या दिशेने धावून जात वाद घालत असल्याचे पाहून देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली. “एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे. पण थेट अध्यक्षांवर धावून जाणं अशोभनीय आहे. जणूकाही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीने अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. लोकं वर गेले, नाही असं नाही. पण अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाही. नाना पटोले स्वत: अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी असं वागणं योग्य नाही. नाना पटोलेंनी (Nana Patole) माफी मागायला हवी,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर आणि वारंवार समज देऊनही नाना पटोले ऐकत नसल्याने, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना दिवसभरासाठी निलंबित करत असल्याची घोषणा केली. यानंतरही विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू ठेवली.
📌 महत्वाच्या बातम्या
- पडळकर अडचणीत? जालन्यात हजारो ख्रिश्चन रस्त्यावर; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!
- खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण: ७ दिवसांत ३२४० रुपयांनी घट, प्रमुख ५ कारणे समोर
- जन सुरक्षा विधेयक: ठाकरे यांचा सरकारला इशारा, ‘रस्त्यावरची लढाई’ अटळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











