🕒 1 min read
जालना: भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ख्रिश्चन धर्मगुरुंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद जालन्यात उमटले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी (३० जून २०२५) सकल ख्रिश्चन समाजाने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढला.
गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने ख्रिश्चन समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे, ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Christian Protest against Gopichand Padalkar
याचबरोबर, या प्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरू आणि संपूर्ण समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मुख्य मागणी या निवेदनातून करण्यात आली.
मोर्चेकऱ्यांनी असा आरोप केला की, ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येचा ख्रिश्चन समाजाशी कोणताही संबंध नसताना, आमदार पडळकर यांनी या प्रकरणाचा संबंध जोडून समाजाची जाणूनबुजून बदनामी केली आहे. पडळकरांना वेळीच लगाम घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पडळकरांच्या वक्तव्यांमुळे केवळ ख्रिश्चन समाजाच्या भावनाच दुखावल्या नाहीत, तर यामुळे समाजातील शांतता आणि लोकशाही मूल्यांवरही आघात झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात ( Gopichand Padalkar ) कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या मोर्चाचे नेतृत्व वैभव उगले, लालबहादूर कांबळे, चंद्रसेन निर्मल, डी. वाय. भालेराव, रविकांत दानम, अनिल साठे, दीपक केदार आदींनी केले. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मोर्चासमोर भाषणे दिली. जालना शहर काँग्रेस अध्यक्ष शेख महेमूद, शिवराज जाधव आदींसह अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईत अवजड वाहतूकदारांचा बेमुदत संप; शालेय बसेस, कंटेनर वाहतूक ठप्प, वारकरीही अडचणीत
- नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “विजयी मेळावा म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे?”
- लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, तहात हरायचं नाही; हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












