🕒 1 min read
मुंबई – शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युतीबाबतच्या चर्चांना सध्या उधाण आलेले असताना, मनसेचे संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत, ‘दबावाचे राजकारण करू नका,’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबत उघडपणे सकारात्मक भूमिका घेतली. “राज्याच्या मनात जे आहे, तेच मी करणार,” असे सांगत जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना युतीविषयी माहिती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मात्र, या भूमिकेवर मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
Sandeep Deshpande warns Uddhav over MNS-Shiv Sena alliance
“2019 मध्ये कार्यकर्त्यांचे मत घेतले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते,” असे ठाम मत संदीप देशपांडे यांनी मांडले. ते म्हणाले, “आजच्या घडीला युतीपेक्षा राज्यातील ज्वलंत प्रश्न महत्त्वाचे आहेत. हिंदी सक्तीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आमच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि मराठी भाषा हेच खरे मुद्दे आहेत.”
देशपांडे पुढे म्हणाले, “काल जो उत्साह दिसला, तो गेल्या 19 वर्षात कधीच दिसला नाही. अचानक बॅनर लागायला लागले, सकारात्मकता दिसायला लागली, यामागे नेमकं काय आहे?” असा प्रश्नही देशपांडेंनी उपस्थित केला. त्यांनी यावेळी संजय राऊतांच्या पूर्वीच्या वक्तव्याची आठवण करून दिली “चार महिन्यांपूर्वी तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचा फोटो का लावत आहात, असा सवाल करत होतात, आणि आज तेच फोटो लावले जात आहेत.”
“तुमच्यावर वाईट वेळ आहे, तुम्ही पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात, ते समजू शकतो. पण त्याचा अर्थ असा नाही की आमच्यावर दबाव आणाल. निर्णय घ्यायचा असल्यास तो राज ठाकरे घेतील. शिवसेनेत आमदारांचे संख्याबळ वाढले असते तरच कार्यकर्त्यांचा उत्साह दिसला असता का?”
शेवटी, त्यांनी टोला लगावत विचारले “शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारले का? काँग्रेससोबत युती करताना बैठकांमध्ये निर्णय घेतले का?” आणि त्याच धर्तीवर मनसेला युतीसाठी दबावात आणण्याचा प्रयत्न न करण्याचा स्पष्ट इशारा दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ११,३६६ एकर वनजमिनीवर अतिक्रमण! उच्च न्यायालयाची राज्य सरकारला थेट नोटीस
- “ठाण्याचा अब्दुल्ला ते बूट चाटेगिरी” पर्यंत – राऊतांचा शिंदेंवर संताप
- जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा : आणखी 12 अधिकारी निलंबित, चौकशीची व्याप्ती वाढली









