Share

फडणवीस सरकार झुकलं! हिंदी सक्तीचा निर्णय रद्द; ठाकरे बंधूंचा ५ जुलैचा मोर्चा स्थगीत – संजय राऊत

Maharashtra govt scraps compulsory Hindi; Thackeray brothers’ march called off. sanjay Raut celebrates ‘Marathi unity’.

Published On: 

Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis over Deenanath Mangeshkar Hospital incident

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहिलीच्या इयत्तेपासून हिंदी भाषा सक्तीच्या ( Hindi compulsory ) निर्णयावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन हा वादग्रस्त निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी ‘मराठी एकजुटीचा विजय’ असे सांगत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चात राज्यातील सर्व मराठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन या संबंधित सरकारी आदेशाची होळी करून आपला निषेध नोंदवला होता. मात्र, ठाकरे बंधूंचा हा संयुक्त मोर्चा निघण्यापूर्वीच राज्य सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, १६ एप्रिल आणि १७ जूनचे त्रिभाषा सूत्राचे दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची माहिती दिली. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून त्रिभाषा सूत्राचा सखोल अभ्यास केला जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तातडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण.. ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय. छान).”

सरकारच्या या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही यासंदर्भात मोठी पोस्ट लिहिली असून, राज्यातील मराठी अस्मितेच्या या लढ्याला मिळालेल्या यशामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राज ठाकरेंची पोस्ट

“इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.

पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.

अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.

आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये… त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.

असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा. मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.”

 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही