🕒 1 min read
अमरावती: शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आता आंदोलनाचे नवे रणशिंग फुंकले आहे. गुरुकुंज मोझरी येथे आठ दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर, सरकारने लेखी आश्वासन देऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने बच्चू कडू हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सरकारच्या आश्वासनपूर्तीसाठी दबाव आणण्यासाठी येत्या ७ जुलैपासून अमरावती ते यवतमाळ अशी १३८ किलोमीटरची लांब पल्ल्याची पदयात्रा काढण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी बच्चू कडू ( Bachchu Kadu ) यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने कर्जमाफीच्या मुद्यावर समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, अजूनही अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने बच्चू कडू यांनी सरकारला नव्याने इशारा दिला आहे. “सात बारा करून घेऊ कोरा, नाहीतर सरकारचे वाजवू बारा,” असा थेट नारा देत त्यांनी सरकारला खडसावले आहे.
Bachchu Kadu March for Farmers Loan Waiver
प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांच्या मूलभूत हक्कांसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून ७ जुलै रोजी पदयात्रेचा प्रारंभ होईल.
ही पदयात्रा दोनद, उंबर्डा बाजार, लोही, तरणोडी, मानकी, तळेगाव, दारव्हा, वळसा, लाखखिंड, तिवरी, चिरकूटा, तूपटाकळी, वसंतनगर, काळी दौलत, माळकिन्ही, गुंज या गावांतून मार्गक्रमण करत, १४ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण (साहेबराव करपे – पहिली शेतकरी आत्महत्या झालेले गाव) आंबोडा येथे पोहोचेल. एकूण सात दिवसांत ही १३८ किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली जाईल.
या पदयात्रेमागे अनेक प्रमुख मागण्या आहेत:
१. तत्काळ कर्जमाफी लागू करणे.
२. शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली थांबवणे.
३. शेतकरी आत्महत्या रोखणारी धोरणे तत्काळ लागू करणे.
४. विधवा आणि दिव्यांगांसाठी रोजगार व सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
५. मनरेगा (MGNREGA) अंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंतच्या कामांचा विस्तार करणे आणि मजुरी वाढवणे.
६. तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे.
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, ही यात्रा केवळ एका राजकीय व्यक्तीची नसून, ती शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या हक्कासाठीची लोकचळवळ आहे. प्रत्येक ठिकाणी सभा, संवाद आणि स्थानिक अडचणी समजून घेण्यासाठी थांबे घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. “आम्ही सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत, त्या सर्वसामान्यांच्या आहेत आणि त्या सरकारने पूर्ण केल्याच पाहिजेत,” असे बच्चू कडू ( Bachchu Kadu ) यांचे ठाम मत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो कारण त्यांनी…”
- भारत-पाकिस्तान महामुकाबला पुन्हा होणार! आशिया चषकच्या तारखा जाहीर, कधी आणि कुठे?
- ‘लाडकी बहीण’ योजनेचे ₹1500 मिळवण्यासाठी आता घरबसल्या अर्ज करा, संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











