🕒 1 min read
मुंबई: महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठी माणसाच्या हितावरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी थेट प्रत्युत्तर दिलं. “मराठी माणसाचं पोट फक्त भाषणं देऊन भरणार नाही,” असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो, कारण त्यांनी ज्या प्रकारचा कारभार चालवला, त्यामुळेच आमचं सरकार सत्तेवर आलं. आम्हाला जी काही कामं करायची संधी मिळाली, ती त्यांच्यामुळेच मिळाली.” त्यांनी उद्धव ठाकरेंना अनेक प्रश्न विचारले. “मराठी माणसाचं ते बोलतात, मग पत्रा चाळीतल्या मराठी माणसाचं काय? बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाचं काय? अभ्युदय नगरमधल्या मराठी माणसाचं काय? गिरगावातल्या मराठी माणसाचं काय? या मुंबईतून मराठी माणूस सोडून गेला, त्याला ते जबाबदार नाहीत का?” असे सवाल फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) केले. “त्या मराठी माणसाला घर देण्याचं काम एकनाथ शिंदेंच्या सरकारने, आमच्या सरकारने केलं आहे,” असेही ते म्हणाले.
Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray
फडणवीस पुढे म्हणाले, “मराठी माणसाचं पोट भाषणं देऊन भरणार नाही. मराठी माणसाच्या गोष्टी करायच्या आणि ‘धन्नासेठांच्या’ पाठीशी उभं राहायचं, ही त्यांची नीती होती. आज त्यांच्यापुढे हा प्रश्न आहे की, मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा कुणी बंद केल्या? त्या सीबीएससीकडे कशा वळल्या? सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत, काळजी करू नका,” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं.
त्रिभाषा सूत्राच्या नव्या शिक्षण धोरणावरून सुरू असलेल्या वादावरही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना घेरलं. ते म्हणाले, “त्रिभाषा सूत्र जे नव्या शिक्षण धोरणात आलं आहे, ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच आलं आहे. रघुनाथ माशेलकर समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी पहिलीपासून हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा स्वीकारल्या जाव्यात असा अहवाल दिला. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने तो अहवाल स्वीकारला आणि कॅबिनेटच्या बैठकीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची सही आहे.”
फडणवीस यांनी आरोप केला की, “आता उद्धव ठाकरे त्याचच राजकारण करत आहेत. आम्ही वारंवार सांगितलं आहे की मराठी अनिवार्य आहे, इतर कुठलीही भाषा तुम्ही शिकू शकता. पण तुम्ही लक्षात घ्या, यांचा विरोध हिंदीला आहे, भारतीय भाषेला विरोध आहे आणि इंग्रजीसाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “आम्ही जो निर्णय घेतला होता, त्यात कुठलीही भारतीय भाषा अशी तरतूद केली होती. पण कोणत्या वर्गापासून ते सुरू करायचं याबाबत मतमतांतरं आहेत. त्यामुळे आम्ही नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्रिभाषा सूत्र आणू. प्राथमिक दृष्ट्या जी चर्चा झाली, त्यात त्यांनी तीन महिने अवधी मागितला आहे.”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, “माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी एकत्र राहावं.”
शेवटी फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंना केवळ राजकारण करायचं आहे. मराठी माणसाचं नाव पुढे करून उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे मराठी माणसालाच मुंबईच्या बाहेर काढलं, याची माझ्याकडे दहा उदाहरणं आहेत. आता त्याच मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे,” असेही त्यांनी ( Devendra Fadnavis ) महायुतीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत-पाकिस्तान महामुकाबला पुन्हा होणार! आशिया चषकच्या तारखा जाहीर, कधी आणि कुठे?
- ‘लाडकी बहीण’ योजनेचे ₹1500 मिळवण्यासाठी आता घरबसल्या अर्ज करा, संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
- हिंदी सक्ती रद्द! ठाकरेंच्या मोर्चापूर्वीच फडणवीस सरकार झुकलं, राज-उद्धव ठाकरेंना यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now