🕒 1 min read
मुंबई : राज्य परिवहन (ST) महामंडळातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा (Maharashtra Govt) निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) प्रलंबित मागण्यांचा विचार करत महायुती सरकारने महागाई भत्ता Dearness Allowance (DA), घरभाडे भत्ता House Rent Allowance (HRA) आणि वार्षिक वेतनवाढीच्या दरात वाढ (Annual Salary Increment) करण्याची घोषणा केली आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विधानसभेत निवेदन देत ही माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के करण्यात आला आहे. तसेच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली असून, तो ८-१६-२४ टक्क्यांवरून १०-२०-३० टक्के करण्यात आला आहे.
याशिवाय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
५,६४९ कोटी रुपयांच्या देयकांसाठी प्रयत्न
महागाई भत्ता Dearness Allowance (DA), घरभाडे भत्ता House Rent Allowance (HRA), वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे ५,६४९ कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन आवश्यक ते प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाहीही परिवहन मंत्र्यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या कर्मचारी संघटनांचे आणि कृती समितीतील सदस्यांचे त्यांनी आभार मानले. या निर्णयानंतर २९ जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मनोबलाला बळ
“हा निर्णय केवळ वेतनवाढीचा नसून कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा आणि विश्वासाचा विजय आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या योगदानाचा शासनाने गौरव केल्याचे त्यांनी म्हटले.
कर्मचारी समाधानी असतील तर लालपरी अधिक सक्षमपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला. एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रवासी-केंद्रित बनवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- Pune Crime : १७ कोटींच्या शाही लग्नाची तयारी, पण नात्यातच दडलं होतं हत्येचं रहस्य
- Big News : Uniform Civil Code लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज
- “पैसा फेको तमाशा देखो”; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












