प्रतिनिधी, 3 नोव्हेंबर: सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सत्तेत आपल्या हक्काचे चार ते पाच मराठा मंत्री असायलाच हवेत, अशी स्पष्ट भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. इतर समाजातील लोकांना त्यांच्या मंत्र्यांचा थेट आधार मिळतो, मात्र मराठा समाजाला कुणाचाही आधार मिळत नाही. त्यामुळेच आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल होतात, जमिनी बळकावल्या जातात आणि अधिकारी, व्यावसायिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांना नाहक त्रास होतो, असे ते म्हणाले. असे असले तरी आपण राजकारणात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी फायनान्स कंपन्यांचे कर्ज भरू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. नांदेडमध्ये एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याच्या घटनेवर त्यांनी संताप व्यक्त केला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने संबंधित कार्यालय फोडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना, आपण या शेतकरी कुटुंबाची भेट घेणार असून हा विषय सरकारदरबारी लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण ताकदीने शेतकरी कुटुंबासोबत लढणार असून फायनान्सवाल्यांना एक रुपयाही देऊ नका, असे ते म्हणाले.
सध्याचे दुष्काळाचे संकट कायम राहणार नसून शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये, अशी भावनिक साद जरांगे यांनी घातली. आत्महत्या केल्यास मुलाबाळांचे मोठे हाल होतात, त्यामुळे हात जोडून आणि पाया पडून मी विनंती करतो की आपले जीवन संपवू नका, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारकडून आपल्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. आपण मॅनेज होत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोक मराठा समाजातीलच काही माणसे आणि महिलांना विकत घेऊन आपल्या विरोधात बोलायला लावत आहेत, असा दावा त्यांनी केला. मात्र, आता कोणीही मराठा बांधव आंदोलनाच्या विरोधात बोलत नसल्याचे सांगत, आपलीच लोक अंगावर पाठवणाऱ्या या खेळीपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी समाजाला केले.
स्वतःच्याच लोकांना विरोधात उभे करणाऱ्यांचे राजकीय करिअर संपवणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. २०२९ मध्ये कोणाची तरी जिरवायची असून, मी सांगेन तिथेच मतदान करा, असे ते म्हणाले. भविष्यातील रणनीती आत्ताच उघड केल्यास विरोधक वेगळे पाऊल टाकतील, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राजू तडवी बिडकीनचे नवे प्रभारी
- शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना थेट मदत; पाणीटंचाईग्रस्त तुळशी गावाला दिला ५० लाखांचा धनादेश
- न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








