मुंबई, 6 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना सुरुवातीला पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील चाचण्यांसाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सचिन अहीर आणि मिलिंद देवरा हे नेतेही उपस्थित होते. भेटीनंतर बोलताना शिंदे म्हणाले, “मी नुकतीच पवार साहेबांची भेट घेतली. त्यांची प्रकृती उत्तम असून सुधारणा होत आहे. उद्या साहेबांना डिस्चार्ज मिळेल. पवारसाहेब मोठे नेते आहेत. भेटीत राज्यातील दुष्काळ आणि त्यावरील उपाय योजनांवर चर्चा झाली. सध्या त्यांनी डिस्चार्जसाठी घाई करू नये आणि विश्रांती घ्यावी असे मी त्यांना म्हणालो. डॉक्टरांनीही प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले आहे.”
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे वाटण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. आजचे नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हेदेखील रुग्णालयात जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे. याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि राजनाथ सिंग यांनीही फोनवरून पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली. विश्वसनीय सूत्रांनुसार, सुमारे तासाभरापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी फोन करून गांधी कुटुंबीयांच्या वतीने पवारांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
गुरुवारी (ता. ५) राष्ट्रवादीचे खासदार आणि जुने सहकारी प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पवारांशी विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली. मंत्री छगन भुजबळ यांनीही काल भेट घेतली. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही रुग्णालयात जाऊन पवारांची विचारपूस केली.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रुग्णालयात भेट घेऊन पवारांना आपले ‘बोध कीर्तन’ हे पुस्तक दिले. तसेच खासदार अनिल देसाई, शेकापचे जयंत पाटील आणि उद्योगपती गौतम अदानी यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेदेखील त्यांची भेट घेणार आहेत. पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना आज किंवा उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय: मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
- सरकार कोणत्याही पक्षाचं असो, सत्तेत ५ मराठा मंत्री असायलाच हवेत: मनोज जरांगे पाटील
- राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी; निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








