प्रतिनिधी, 3 नोव्हेंबर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशाला मोदीजीच हवे असून, राहुल गांधी यांना देशात अतिडावी (अल्ट्रा लेफ्टिस्ट) व्यवस्था उभी करायची आहे, असा घणाघात त्यांनी केला. लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ही लढाई केवळ भाजप, मोदी किंवा एनडीएची नसून देशाच्या संविधानासाठी सुरू असलेले हे एक छुपे युद्ध आहे, असे फडणवीस म्हणाले. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेत ज्याप्रमाणे ‘रेजीम चेंज’ करत संविधान बदलण्यात आले, त्याच आंतरराष्ट्रीय षडयंत्रांतर्गत काँग्रेसचे ‘कच्चेबच्चे’ रोज मोर्चे काढत आहेत. यासाठीच फ्रांस आणि डेन्मार्कमध्ये अराजक माजवणारे, पण आतून कोरे असलेले ‘लाल पुस्तक’ वापरले जात असल्याची टीका त्यांनी केली. आपण निळे संविधान बघितले होते, मात्र हे लाल संविधान घेऊन फिरत आहेत, असेही ते (Devendra Fadnavis) म्हणाले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही संविधान संपवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या मजबूत नेत्या असूनही त्यांना ते शक्य झाले नाही, मग राहुल गांधी ‘किस खेत की मुली’ आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. इंदिरा गांधींची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली होती. त्यांना पंतप्रधान राहता येईल मात्र लोकसभेत बोलता किंवा मतदान करता येणार नाही, असा निकाल होता. मात्र, काँग्रेसने पाशवी बहुमताच्या जोरावर पंतप्रधानांना संविधानाच्या वर नेऊन ठेवले आणि १९७६ मध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवण्याचे काम केले.
१९७७ मध्ये मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी संविधानात संशोधन करून पंतप्रधानांना पुन्हा संविधानाच्या खाली आणले व मूलभूत अधिकार बहाल केले, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. काँग्रेसने अनेकवेळा संविधानाशी छेडछाड केली असून, आता इंदिरा गांधींच्या नातवाने तेच काम सुरू केले आहे. ‘बॉटल नई है, शराब वहीं है’ अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले. तसेच, ‘रेजीम चेंज’चा अर्थ माहीत नसतानाही उद्धव ठाकरे त्यास होकार देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संविधानाने निर्माण केलेल्या आरबीआय, आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर काँग्रेसकडून जाणीवपूर्वक मोर्चे काढले जात आहेत. न्याय न देणाऱ्या संस्था मोडून काढण्याचा त्यांचा डाव म्हणजेच संविधान मोडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. यावर गप्प बसणाऱ्या आणि फक्त मोदींना विरोध करताना ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचे बोलणाऱ्या ‘बाजारू’ विचारवंतांवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण ‘रेजीम चेंज’ होऊ देणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राजू तडवी बिडकीनचे नवे प्रभारी
- शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना थेट मदत; पाणीटंचाईग्रस्त तुळशी गावाला दिला ५० लाखांचा धनादेश
- न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








