🕒 1 min read
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MSC बँक) कथित गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ED) त्यांच्या विरोधात विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
या प्रकरणात कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीसंदर्भात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. ईडीच्या तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने कन्नड SSK साखर कारखाना सुमारे ५० कोटी रुपयांना विकत घेतला होता. हा व्यवहार योग्य पद्धतीने न होता संगनमत करून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ED files chargesheet against Rohit Pawar
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोली प्रक्रियेत फेरफार करून बारामती ॲग्रोने ( Baramati Agro ) कारखाना विकत घेतल्याचा आरोप आहे. यासाठी हायटेक नावाच्या कंपनीशी संगनमत करून लिलावात इतर बोलीदारांपेक्षा कमी रक्कम सांगणारे व्यवहार करण्यात आल्याचे ईडीच्या निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. याच व्यवहारासाठी काही रक्कम हायटेककडे हस्तांतरित करण्यात आली होती, असा आरोपही आहे.
या सर्व प्रकरणाची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २२ ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ईडीने २६ ऑगस्ट २०१९ रोजी मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) तपास सुरू केला.
२०२३ मध्ये रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवली होती. यानंतर ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे, बारामती आणि मुंबई येथे बारामती ॲग्रोसह अन्य संबंधित कंपन्यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. २४ जानेवारी रोजी रोहित पवार यांची चौकशीही झाली होती, जी तब्बल १२ तास चालली.
या प्रकरणात आतापर्यंत १२१ कोटी ४७ लाख रुपयांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केली असून, एक मूळ आणि दोन पुरवणी आरोपपत्रे दाखल झाली आहेत. विशेष बाब म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास बंद केला असला, तरी ईडीने तपास पुढे चालू ठेवत आता नवीन पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस; ‘व्हिट्स हॉटेल’ प्रकरणामुळे चौकशी की राजकीय दबाव?
- ‘बाहेर ये तुला दाखवतो!’ मंत्री शंभूराज देसाईंची आमदाराला धमकी; मराठीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत खडाजंगी
- संजय गायकवाड मारहाण प्रकरणात नवं वळण; कॅन्टिनचा परवाना रद्द, आमदार मात्र अजूनही मोकळे









