🕒 1 min read
वॉशिंग्टन: इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अमेरिकेच्या मध्यस्थीने तात्पुरता निवळला असला तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी इराणला पुन्हा एकदा कठोर शब्दांत इशारा दिला आहे. जर इराणने पुन्हा आण्विक तळ विकसित करण्यास सुरुवात केली, तर कोणताही प्रश्न न विचारता लष्करी हल्ला करण्याचे आदेश देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे या दोन देशांमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेने नुकताच इराणमधील तीन आण्विक तळ (फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान) नष्ट केल्याचा दावा केला होता. या हल्ल्यांसाठी अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब वापरले गेले होते, जे मजबूत भूमिगत लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. या हल्ल्यांनंतर इराणच्या आण्विक तळांचे किती नुकसान झाले, यावर अजूनही प्रश्नचिन्ह असताना, ट्रम्प ( Donald Trump ) यांनी हा नवा इशारा दिला आहे.
Donald Trump warns Iran
पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की, “जर गुप्तचर अहवालात असे आढळून आले की इराण पुन्हा आण्विक तळ विकसित करत आहेत, तर तुम्ही पुन्हा त्या देशावर हल्ला करण्याचा विचार कराल का?” यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिले, “हो, निःसंशयपणे, अगदी कोणताही प्रश्न न करता.” ट्रम्प यांच्या या विधानाने अमेरिकेची इराणबद्दलची आक्रमक भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानामुळे जपानमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याची तुलना करताना ट्रम्प यांनी हे हल्ले “हिरोशिमा-नागासाकीसारखे होते” असे विधान केले होते. यावर जपानने तीव्र निषेध नोंदवला आहे. नागासाकीचे महापौर शिरो सुझुकी यांच्यासह स्थानिक नेत्यांनी ट्रम्प यांच्या या टिप्पणीला जोरदार आक्षेप घेतला आहे. “जर ट्रम्प यांच्या टिप्पण्या अणुबॉम्ब टाकण्याचं समर्थन करत असतील, तर ज्या शहरावर बॉम्ब टाकण्यात आले होते, त्या शहरासाठी हे अत्यंत खेदजनक आहे,” असे महापौर सुझुकी यांनी म्हटले आहे.
एकंदरीत, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष निवळला असला तरी, ट्रम्प ( Donald Trump ) यांच्या ताज्या इशाऱ्यामुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज-उद्धव एकत्र येणार का? आशा भोसले म्हणाल्या, मला फक्त आशिष शेलार माहिती!
- “रडत होते, पाया पडले… तरी त्याने बलात्कार केला!” लॉ कॉलेजमध्ये संतापजनक घटना
- लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, मोठ्या नेत्यासह तिघांना अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now