🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) ता. १६: मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे श्रेय घेण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील ( वाशी) आंदोलन मागे घेतल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याचे श्रेय मिळाल्याचे चित्र होते. मात्र, आता मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलना नंतर फडणवीस यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून स्वतःला सन्मानित करून आरक्षणाचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
नवी मुंबईतील वाशी येथे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मोठा जल्लोष साजरा झाला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचे आरक्षण मिळाल्याचे श्रेय दिले गेले. मात्र, त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू करण्याची मागणी मान्य केली होती.
Devendra Fadnavis on Maratha reservation
हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर मराठा समाजात अपेक्षित असलेला आनंदोत्सव मात्र दिसून आला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तींच्या वतीने अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टाळून केवळ मुख्यमंत्र्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत जाहिराती प्रसिद्ध झाल्या, तसेच अनेक शहरांमध्ये मोठे बॅनर लावले. मात्र, याचा हवा तसा परिणाम झाला नाही. आता उद्या (१७ सप्टेंबर) मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. याच दिवसाचे औचित्य साधून मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी फडणवीस यांनी नवी रणनीती आखली आहे. मराठा चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.
याच संदर्भात मराठा चळवळीतील कार्यकर्ते नितीन कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘उद्या काही दलाल मराठा क्रांती मोर्चाच्या नावावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. लक्षात ठेवा, समाजाचे वाटोळे करणार असाल तर फटके.’ त्यांच्या या पोस्टमुळे मराठा समाजातील अंतर्गत वाद उघड झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने मराठा आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्या हस्ते आपला सत्कार करून घेण्याचे ठरवले होते. मात्र, मराठा समाजाने ज्यांना मुख्य प्रवाहातील कार्यकर्ते मानले नाही, अशाच कार्यकर्त्यांकडून या सोहळ्यात स्वतःचा सन्मान करून घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्या कार्यकर्त्यांना मराठा समाजाने नाकारले आहे, अशांना सोबत घेऊन फडणवीस हे आरक्षणाचे श्रेय मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींवरून मराठा आरक्षण मिळाले असले, तरी त्याचे श्रेय कोणाला मिळणार यावरून वाद सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा समाजाला १० टक्के आरक्षण नकोय का?’, छगन भुजबळांचा मराठा समाजाला रोखठोक सवाल
- मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच ८ मंत्र्यांचे राजीनामे, भाजपला ११ वर्षांत पहिल्यांदाच धक्का
- ‘जय शहा त्यांच्या स्वकर्तृत्वावर बीसीसीआयचे अध्यक्ष झाले’, आशिष शेलारांचे मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












