🕒 1 min read
अहिल्यानगर, (राजेभाऊ मोगल): महाराष्ट्राला पुन्हा एकदा मान खाली घालायला लावणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका १९ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तिला देवाची आळंदी येथील कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे ( Sunita Andhale ) यांच्या ‘श्री. भगवानबाबा वारकरी संस्थेत’ डांबून ठेवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
२ जून रोजी सायंकाळी शेवगाव तालुक्यात ही घटना घडली. पीडित मुलीने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार, शेजारच्या गावातील जनाबाई आंधळे हिने तिला शेतात चल असे सांगून सोबत घेतले. जुन्या ओळखीमुळे मुलगी तिच्यासोबत निघाली. मात्र, जनाबाईने तिला एका गाडीत बसवले, ज्यात तिचा मुलगा अण्णासाहेब आंधळे आणि इतर अनोळखी व्यक्ती आधीच उपस्थित होते. मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, तिला धमक्या देण्यात आल्या.
Teen Girl Abducted, Assaulted in Sunita Andhale institute
अहिल्यानगर येथे पोहोचल्यावर जनाबाई गाडीतून उतरली. मुलीने पुन्हा विरोध केला असता, अण्णासाहेबने तिला ॲसिडची बॉटल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे ती घाबरून गप्प बसली. त्यानंतर तिला देवाची आळंदी येथे अण्णासाहेबच्या भावकीतील सुनीता आंधळे यांच्या घरी नेण्यात आले. तिथे अण्णासाहेबने तिला लग्नाची मागणी घातली. मुलीने नकार दिल्यावर अण्णासाहेबने सुनीता आंधळे ( Sunita Andhale ) आणि प्रवीण आंधळे यांच्या मदतीने तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.
पोलिसांचा निष्काळजीपणा आणि धमक्या?
अत्याचारानंतर पीडित मुलीला खोलीत एक मोबाईल सापडला. तिने तात्काळ ११२ या हेल्पलाइन नंबरवर कॉल केला. सकाळी आठ वाजता आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित मुलगी व अण्णासाहेबला बाहेर काढले. मात्र, मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तिने तात्काळ घरी सोडण्याची विनंती केली आणि कोणतीही माहिती दिली नाही.
पीडित मुलीच्या वडिलांना ही बाब समजताच, त्यांनी पुणे परिसरातील आपल्या नातेवाईकांना सुनीता आंधळे यांच्या घराकडे पाठवले. पोलिसांनी मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले. यानंतर कुटुंबीयांनी मुलीचे लग्न बीड जिल्ह्यातील एका गावात जुळवले. मात्र, अण्णासाहेब आंधळेने लग्न जुळलेल्या ठिकाणी फोन करून धमक्या दिल्या आणि मुलीसोबतचे काही फोटो पाठवले, ज्यामुळे हे लग्न मोडले.
वडिलांचे गंभीर आरोप: पोलीस चौकशीत टाळाटाळ आणि धमकी!
एकीकडे मुलीची इज्जत वाचावी म्हणून कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसात तक्रार केली नाही. परंतु, लग्न मोडल्याने आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने, त्यांनी अखेर शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, इथेही त्यांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. पीडित मुलीच्या वडिलांनी ‘सत्ताकारण’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चार दिवस पोलीस त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होते. अखेर, ८ जुलै २०२५ रोजी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली.
आरोपींना अद्याप अटक का नाही, असे विचारले असता, पोलीस उपनिरीक्षक लहाने यांनी, “आम्ही देव नाहीत, आरोपी आम्हाला सापडत नाहीत, तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन जा,” असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे वडिलांनी सांगितले. एवढेच नाही तर, “जास्त बोलाल तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू,” अशी धमकीही लहाने यांनी दिल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे.
या प्रकरणी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहनचालक, कीर्तनकार सुनीता आंधळे ( Sunita Andhale ) आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे यांच्याविरोधात शेवगाव (जि. अहिल्यानगर) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावरील या अन्यायाविरोधात आता पीडित मुलीचे वडील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृह विभागाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- डिजिटल युगातील व्यवसायाची गुरुकिल्ली: डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे?
- नवीन भाषा कशी शिकाल? प्रवासाच्या सुरुवातीपासून प्रगतीपर्यंतचे सोपे आणि प्रभावी टप्पे!
- आरोग्याची गुरुकिल्ली: निरोगी जीवनशैलीसाठी ‘या’ ६ सोप्या नियमांचे पालन करा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












