Rain Forecast: ऑगस्ट महिना कोरडा गेला, आता सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडेल का? हाच प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. कारण, समोर आलेली आकडेवारीच तशी धडकी भरवणारी आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याने विदर्भावर आता भीषण दुष्काळाचं महासंकट घोंघावू लागलंय.
हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये संपूर्ण विदर्भात तब्बल ५८ टक्के कमी पाऊस झालाय. सरासरी २९७ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात अवघा १२५ मिलिमीटर पाऊस पडला. हवामान शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात परिस्थिती सर्वात भयानक आहे. तिथे चक्क ८४ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. त्यापाठोपाठ अमरावती (८२%), यवतमाळ (७८%), वर्धा (७३%) आणि नागपूर-वाशिममध्ये (७१%) पावसाची मोठी तूट पाहायला मिळाली. खरिपाची पिकं आता पूर्णपणे धोक्यात आली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यावर ‘एल निनो’चं सावट
एकीकडे धरणांमधला पाणीसाठा कमी होतोय, तर दुसरीकडे नागपूर हवामान विभागाने एक छोटासा दिलासा दिला आहे. २ ते ५ सप्टेंबर दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते दमदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस पडला, तरच करपणाऱ्या पिकांना थोडं जीवदान मिळेल.
हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांच्या मते, राज्यात सध्या ‘एल निनो’ सक्रिय झाला असून ‘इंडियन ओशन डायपोल’ तटस्थ स्थितीत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. थोडक्यात सांगायचं तर, सप्टेंबरच्या सुरुवातीचा पाऊस वगळता, उर्वरित हंगामात विदर्भ आणि मराठवाड्यावर मोठं दुष्काळी सावट राहण्याची दाट शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘इथे १५ दिवस रक्ताचा वास येत होता…’; अधिकाऱ्यांसमोर जरांगे पाटील भावूक, सरकारला अल्टिमेटम!
- ‘अधिकाऱ्यांना का पाठवलं? थेट जीआर घेऊन या…’; मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव धुडकावला, उपोषण सुरूच!
- ‘अखिल भारतीय छावा संघटना’ थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मोठी मागणी!












