काही आठवड्यांपूर्वी ज्या मैदानावर भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवून विश्वचषक उंचावला, त्याच डीवाय पाटील स्टेडियमवर आज पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. पण यावेळी फरक एवढाच असेल की, टीम इंडियाच्या जर्सीत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या दोन मैत्रिणी आज एकमेकींच्या कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या ठाकणार आहेत. वूमन्स प्रीमियर लीग (WPL 2026) च्या चौथ्या हंगामाचा नारळ आज फुटणार असून, सलामीच्याच सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे दोन तगडे संघ भिडणार आहेत.
आज (शुक्रवार, ९ जानेवारी) नवी मुंबईत हा हायव्होल्टेज ड्रामा रंगणार आहे. एका बाजूला गतविजेत्या मुंबईची कॅप्टन हरमनप्रीत कौर आहे, तर दुसरीकडे आरसीबीची ‘क्वीन’ स्मृती मंधाना आहे. विश्वचषकाचा हँगओव्हर अजून उतरलेला नसतानाच, या दोन स्टार खेळाडूंना एकमेकींविरुद्ध खेळताना पाहणे चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे.
WPL Season 4 kicks off today with MI vs RCB
कागदावर दोन्ही टीम्स मजबूत दिसत असल्या तरी इतिहासाचा कौल मुंबईच्या बाजूने आहे. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण ७ सामने झाले आहेत. त्यापैकी ४ सामन्यांत मुंबईने बाजी मारली आहे, तर आरसीबीला ३ वेळा विजय मिळवता आला आहे. म्हणजेच, सामना ‘काटे की टक्कर’ होणार यात शंका नाही.
आज संध्याकाळी ७ वाजता टॉस होईल आणि ठीक ७:३० वाजता पहिल्या चेंडूचा थरार सुरू होईल. हा सामाना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) तसेच जिओ हॉटस्टार अॅप (JioHotstar App) पाहायला मिळणार आहे.
यंदा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान २२ सामने खेळवले जाणार आहेत. नवी मुंबई आणि वडोदरा येथे हे सामने होतील. आजच्या सलामीच्या लढतीत हरमनप्रीत आपल्या विजयाचा सिलसिला कायम राखणार की स्मृती आरसीबीला विजयाची सुरुवात करून देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- Explained- मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची २५ वर्षे; मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला?
- नाव बदललं, भाषा बदलली, बापाचं नावही खोटं; ३४ वर्षांनी ‘असा’ अडकला बायकोचा खुनी!
- ‘आलास का रे ब्रुस ली?’; मातोश्रीवर बाळासाहेब कोणाला म्हणायचे ‘असं’? अमित ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!













