🕒 1 min read
मुंबई – रोहित शर्मा आला, विराट कोहलीही पोहोचला… पण टीम इंडियाचा ‘स्पायडरमॅन’ म्हणजेच ऋषभ पंत कुठे आहे? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेसाठी बडोद्यात टीम इंडियाचा सराव सुरू झालाय, पण या कॅम्पमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) अजूनही दाखल न झाल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही बिनसलंय की काय? असा प्रश्न पडला असेल तर थांबा, कारण पंतच्या अनुपस्थितीमागे एक खास आणि तितकंच महत्त्वाचं कारण आहे.
बीसीसीआयने सर्व सीनियर खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची अट घातली होती, जी पूर्ण करून विराट-रोहित परतले. मात्र, पंतने बीसीसीआयकडे थोडा वेळ मागून घेतला आहे. दिल्लीचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत येत्या ८ जानेवारीला होणारा विजय हजारे ट्रॉफीचा (Vijay Hazare Trophy) सामना खेळूनच टीम इंडियाला जॉईन करणार आहे.
Rishabh Pant to join Team India camp late
पंत सध्या दिल्ली संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सहापैकी पाच सामने जिंकून तब्बल ५ वर्षांनंतर बाद फेरीत (Knockout Stage) धडक मारली आहे. नॅशनल ड्युटीमुळे पंतला क्वार्टर फायनल खेळता येणार नाही, हे उघड आहे. पण, ८ जानेवारीला होणारा शेवटचा साखळी सामना जिंकून आपल्या टीमला गटात पहिल्या स्थानावर नेण्यासाठी पंत उत्सुक आहे. त्यामुळेच त्याने शेवटची मॅच खेळून मगच कॅम्पला येण्याचा निर्णय घेतला.
पंतने या स्पर्धेत आतापर्यंत ६ सामन्यांत ४२ च्या सरासरीने २१२ धावा कुटल्या आहेत. येत्या ११ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ८ तारखेची मॅच संपवून पंत थेट भारतीय ताफ्यात दाखल होईल.
📌 महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












