Tukaram Mundhe: “पब्लिसिटीसाठी बड्या स्टार्सना मुद्दाम टार्गेट केलं जातंय का?” सध्या हाच प्रश्न बॉलिवूडमध्ये आणि सोशल मीडियावर विचारला जातोय. पण आता थेट डॅशिंग अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच यावर कडक शब्दांत उत्तर दिलंय.
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिन्ही सुपरस्टार एका सुप्रसिद्ध ‘विमल वेलची’ ब्रँडची जाहिरात करतात. या प्रकरणी एफडीएने त्यांना थेट ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. एवढ्या मोठ्या स्टार्सवर कारवाई झाल्याने साहजिकच चर्चांना उधाण आलं. एफडीए केवळ प्रसिद्धीसाठी हे सगळं करत असल्याची टीका होऊ लागली. पण, मुंढेंनी स्पष्ट केलंय की, ही कारवाई कोणत्याही प्रसिद्धीसाठी नाही, तर कायद्याच्या चौकटीत राहूनच झाली आहे.
‘विमल’च्या जाहिरातीवर तुकाराम मुंढेंचा थेट प्रहार
एका पॉडकास्टवर बोलताना मुंढेंनी या कारवाईमागचं सत्य उलगडलं. ते म्हणाले, “ही सरोगेट (छुपी) जाहिरात आहे. २०१८ च्या FSSAI कायद्यानुसार, जी गोष्ट तुम्ही प्रमोट करताय, ती खरी असली पाहिजे. हा कायदा काही मी रात्रीत बनवलेला नाही. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत.”
महाराष्ट्रात पान मसाला किंवा गुटख्यावर पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यात उत्पादन करून, इथे वेलचीच्या नावाखाली पान मसाल्याची जाहिरात करणं थेट दिशाभूल करणारं आणि बेकायदेशीर असल्याचं मुंढेंनी स्पष्ट केलं.
पण मग यात कलाकारांचा काय दोष?
यावर बोलताना मुंढे म्हणाले की, सेलिब्रिटी फक्त पैसे घेऊन मोकळे होऊ शकत नाहीत. “कायद्यात अतिशय स्पष्ट लिहिलंय. जाहिरात करणाऱ्यावरही समान जबाबदारी असते. जर ते नियमांचं उल्लंघन करत असतील, तर त्यांना १० लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.”
दुसरीकडे, आम्ही केवळ स्टार्सना नोटीस पाठवली नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. उत्पादक आणि विक्रेत्यांवरही धडक कारवाई आधीपासूनच सुरू आहे. सेलिब्रिटी हे या साखळीतील तिसरा दुवा आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई अनिवार्य होती.
एफडीएने या स्टार्सना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यांना ही जाहिरात थांबवायला आणि सोशल मीडियावरून सर्व प्रमोशनल व्हिडिओ काढून टाकायला सांगितलं आहे. अद्याप या कलाकारांनी कोणतंही अधिकृत उत्तर दिलेलं नाही.
याआधी शाहरुख खानने एका जुन्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, जर एखादं उत्पादन आरोग्यासाठी हानिकारक असेल, तर सरकारने थेट त्यावर बंदी घातली पाहिजे. “मी एक अभिनेता आहे आणि पैसे कमवणं हे माझं काम आहे. जर तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल तर थेट उत्पादनच थांबवा,” असं शाहरुख म्हणाला होता. आता याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या नैतिक जबाबदारीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा अभूतपूर्व उत्साह! भव्य जलूसमध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग
- संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून
- नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









