Vimal Ad Controversy: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तीन बड्या अभिनेत्यांची आता मोठी अडचण वाढली आहे. कडक आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंनी थेट या सुपरस्टार्सनाच रडारवर घेतलंय. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तिघांनाही ‘विमल इलायची’च्या जाहिरातीवरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीद्वारे ते राज्यात बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’ची अप्रत्यक्ष (सरोगेट) जाहिरात करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Tukaram Mundhe FDA Notice
११ ऑगस्ट २०२६ रोजी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या अभिनेत्यांना स्वतःची बाजू मांडण्यासाठी आणि लेखी स्पष्टीकरण देण्यासाठी केवळ १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास किंवा मुदतीत खुलासा न केल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ (FSS Act) नुसार त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराच एफडीएने दिलाय.
नेमकं प्रकरण काय आहे?
थोडक्यात सांगायचं तर, महाराष्ट्रात पान मसाला आणि गुटख्यावर सक्त बंदी आहे. पण टीव्ही आणि सोशल मीडियावर सतत दिसणाऱ्या ‘विमल इलायची’च्या नावाखाली याच प्रतिबंधित उत्पादनांची अप्रत्यक्ष (सरोगेट) जाहिरात केली जात असल्याचा गंभीर आरोप एफडीएने केलाय. विमल हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे अशा जाहिरातींमधून ग्राहकांची उघडपणे दिशाभूल होत असल्याचं प्रशासनाचं मत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी FSS कायद्याच्या कलम ५३ अंतर्गत तब्बल १० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळेच आता ॲक्शन मोडवर येत एफडीएने या अभिनेत्यांना त्यांचे सर्व प्रमोशनल व्हिडिओ युट्यूब, टीव्ही आणि सोशल मीडियावरून तातडीने हटवण्याचे सक्त आदेश दिलेत.
दुसरीकडे… सरकारी अस्थापनांच्या कॅन्टीनवर आणि हॉटेल्सवर धाडी टाकल्यानंतर मुंढेंनी आता आपला मोर्चा या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींकडे वळवला आहे. या अभिनेत्यांनी ही जाहिरात करण्यापूर्वी नेमकी काय कायदेशीर पडताळणी केली, याचे सर्व करार (Agreements) आणि कागदपत्रेही त्यांना सादर करण्यास सांगितलं आहे. तसंच, विमल इलायची हे स्वतंत्र उत्पादन आहे की पान मसाल्याचीच सरोगेट जाहिरात आहे, हेही त्यांना पुराव्यानिशी स्पष्ट करावं लागणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे आता हे सुपरस्टार्स नेमकं काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- Varanasi Airport Firing: प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटली; कडेकोट सुरक्षेत नेमकं काय घडलं?
- Atif Aslam India Ban: ‘मी भारताला मिस करत नाही!’, १० वर्षांच्या बंदीनंतर आतिफ असलमचा मोठा गौप्यस्फोट
- सैफ अली खानच्या बहिणीचा मोठा गौप्यस्फोट: ‘आईने इस्लाम स्वीकारला, घरात कधीच हिंदू धर्माचं पालन झालं नाही!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











