प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली ‘पंतप्रधान जनधन योजना’ (PMJDY) सर्वसामान्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत बँक खात्यात एकही रुपया नसतानाही खातेधारकांना १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची विशेष सुविधा मिळते. यालाच ओव्हरड्राफ्ट (Overdraft) सुविधा म्हटले जाते.
ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत बँक खातेधारकाला त्याच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे काढण्याची मुभा देते. जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका पात्र खातेधारकाला या १० हजार रुपयांच्या सुविधेचा लाभ दिला जातो. खात्यात ‘झिरो बॅलन्स’ असला तरीही पात्र व्यक्ती ही रक्कम वापरू शकते. मात्र, यासाठी खातेधारकाने आपले बँक खाते किमान सहा महिने योग्य प्रकारे चालवणे आणि योजनेचे निर्धारित पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असते.
ज्या भारतीय नागरिकांचे आधीपासून कोणतेही बँक खाते नाही, अशा व्यक्ती या योजनेअंतर्गत आपले ‘पायाभूत बचत खाते’ उघडू शकतात. या खात्यात किमान शिल्लक रक्कम (Minimum Balance) ठेवण्याची कोणतीही अट नाही. तसेच, यामध्ये जॉईंट अकाऊंट (संयुक्त खाते) उघडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. नागरिक बँकेची शाखा, बिझनेस प्रतिनिधी, बँक मित्र किंवा संबंधित आऊटलेटवर जाऊन आवश्यक केवायसी (KYC) कागदपत्रांसह अर्ज जमा करू शकतात. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर बँक हे खाते सक्रिय करते.
जनधन खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. याशिवाय ओळखपत्राचा पुरावा म्हणून मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा रेशन कार्डपैकी एक दस्तऐवज लागतो. तसेच कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफोन किंवा पाण्याचे बिल ग्राह्य धरले जाते. यासोबतच पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रीतसर भरलेला जनधन खात्याचा फॉर्म असणे अनिवार्य आहे.
या जनधन खात्यावर सामान्य बचत खात्याप्रमाणेच व्याजदर लागू होतात. महत्त्वाचे म्हणजे, हे खाते थेट लाभ हस्तांतरण (DBT), पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PM-JJBY), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PM-SBY), अटल पेन्शन योजना (APY) आणि मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी बँक (मुद्रा) योजनेसारख्या इतर सरकारी योजनांच्या लाभासाठीही पात्र मानले जाते.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








