ठाणे, 18 नोव्हेंबर: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपीला दोन दिवसांच्या तपासानंतर अटक करण्यात आली आहे. हेमंत गुमाने असे या बेड्या ठोकण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील हाऊसिंग बोर्ड परिसरातील गुरुद्वारासमोर शुक्रवारी सायंकाळी ही संतापजनक घटना घडली. विशाखा गायकवाड ही तरुणी कामावरून घरी परतत असताना, काळोखाचा फायदा घेत हेमंतने तिला वाटेत गाठले. त्याने विशाखाला आपल्यासोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने याला नकार दिल्याने संतापलेल्या हेमंतने तिच्यावर चाकूने वार केले.
या हल्ल्यात विशाखाच्या पोटावर, चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने, स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या विशाखावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी हेमंतने घटनास्थळावरून पळ काढला होता.
पोलिसांना गुंगारा देत हेमंतने सलग दोन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये आश्रय घेतला. त्याच्या अटकेचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपी दोन दिवसांनंतर पुन्हा अंबरनाथमध्ये येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हेमंतच्या मुसक्या आवळल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








