प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात झालेल्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामंत यांनी या ऑपरेशनचे संकेत दिल्याने जाधव हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत हे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, उदय सामंत हे राज्याचे उद्योग आणि पालकमंत्री आहेत, ते केवळ एका पक्षाचे मंत्री नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीही भेटू शकते, आम्हीही अनेक मंत्र्यांना भेटतो. केवळ भेट झाली याचा अर्थ ‘ऑपरेशन टायगर’ असा होत नाही, असे स्पष्ट करत राऊत यांनी या अफवांना पूर्णविराम दिला. तसेच, सामंत काही म्हणतात म्हणून निर्णय घेण्याइतके भास्कर जाधव अपरिपक्व नेते नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरून राऊत यांनी सामंतांवर सडकून टीका केली. ‘ऑपरेशन ३.४ काय असते?’ असा सवाल करत, फुटण्याचा ट्युमर त्यांच्याच पोटात वाढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. ज्या सामंतांनी पाच-दहा पक्ष बदलले आहेत, त्यांनी अशा ऑपरेशनच्या गोष्टी करू नयेत, असे म्हणत राऊत यांनी त्यांना ‘सडक्या मेंदूचे’ असे संबोधले.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडेही आपले लक्ष असल्याचे राऊत यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी असल्याचे ते म्हणाले. यासोबतच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली न वाहिल्यावरून भाजपने केलेल्या डिवचण्यालाही त्यांनी उत्तर दिले. ‘कोणी श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून बाळासाहेबांचे मोठेपण कमी होत नाही,’ असा पलटवार राऊत यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; सराव मैदाने मिळणार विनामूल्य
- रोहित पवार हेच तर सूत्रधार नाहीत ना? त्यांचीच चौकशी करा; आमदार देवयानी फरांदे यांची मागणी
- महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल: थंडीचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज







