प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाल्याने थंडीचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे. दिवसा अंशतः ढगाळ, उष्ण आणि कोरडे हवामान तर रात्री आणि पहाटे वाढता गारठा, असे संमिश्र वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे. पहाटेच्या वेळी थंडी वाढल्याने अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. १८ नोव्हेंबर आणि त्यानंतरच्या आगामी दिवसांत राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये हवामान कसे राहील, याबाबत हवामान विभागाने सविस्तर अंदाज वर्तवला आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये थंड व कोरडे हवामान असून १८ नोव्हेंबर रोजी कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवस या भागात दिवसा कोरडे तर रात्री थंड हवामान कायम राहील. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये १८ नोव्हेंबरला कमाल तापमान ३१ अंश तर किमान १७ अंश सेल्सिअस राहील. मात्र, १९ नोव्हेंबरपासून या भागात किमान तापमानात तब्बल ४ अंशांनी तर कमाल तापमानात १ अंशाने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक वाढेल.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही संमिश्र हवामानाची स्थिती आहे. या भागात कमाल तापमान २८ अंश आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून, पुढील दिवशी दोन्ही तापमानांत सुमारे एक अंशाने घट होऊ शकते. पुण्यात पहाटेच्या वेळी गारठा वाढल्याने उबदार कपड्यांचा वापर वाढला असून, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय दिसत आहे.
विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात सध्यातरी कोणताही हवामान अलर्ट नाही. १८ नोव्हेंबरला येथे कमाल तापमान २९ ते ३० अंश तर किमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. मात्र, पुढील दोन ते चार दिवसांनंतर तापमानात आणखी घट होऊन विदर्भात थंडीचा जोर वाढेल. तसेच, चार ते पाच दिवसांनंतर काही भागांत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने तिथे ‘यलो अलर्ट’ जारी केला जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाड्यात थंडीचा विशेष प्रभाव जाणवत नसून, कोणतेही हवामान अलर्ट देण्यात आलेले नाहीत. या भागात प्रामुख्याने उष्ण, कोरडे आणि काही ठिकाणी दमट हवामान आहे. १८ नोव्हेंबरला मराठवाड्यात कमाल तापमान ३७ अंश आणि किमान २३ अंश सेल्सिअस राहील. पुढील तीन ते चार दिवस राज्यात संमिश्र हवामानाची स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढेल. त्यामुळे रात्री व पहाटे घराबाहेर पडताना नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुढचा बॉम्ब टाकल्यावर मुख्यमंत्री राजीनामा देतील: एसआरए घोटाळ्यावरून संजय राऊतांचा खळबळजनक दावा
- श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून बाळासाहेबांचे महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार
- हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? कपड्यांपासून आहारापर्यंत ‘या’ खास टिप्स ठरतील फायदेशीर







