बीड, 18 नोव्हेंबर: जुनी दुचाकी खरेदी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून बीडमधील वाणगाव येथे आलेल्या दोन मित्रांना चोरीच्या संशयावरून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी या तरुणांना शेतातील नांगराला आणि ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संभाजी सारूक असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संभाजी आपल्या एका मित्रासोबत दुचाकी खरेदीच्या आर्थिक व्यवहारासाठी वाणगाव (ता. बीड) येथे गेला होता. मात्र तिथे त्यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आणि त्यातून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर नंतर भीषण हाणामारीत झाले. संशयितांनी दोन्ही मित्रांना ट्रॅक्टर व नांगराला बांधून अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली.
या मारहाणीत संभाजी सारूक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात एकूण पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत पाचपैकी चार आरोपींना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या नेकनूर पोलीस एका फरार आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








