धाराशिव, 14 नोव्हेंबर: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने २९ वर्षीय मुलाने त्यांच्या डोक्यात लोखंडी फुकारीने वार करून हत्या केली. येवती गावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
येवती येथील डोंबाळे वस्तीत राहणारा आरोपी श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय २९) याने १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वडील खंडू पांडुरंग डोंबाळे (वय ५६) यांच्याकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. यावर वडिलांनी, ‘आता रात्र झाली आहे. कोणालाही फोन करू नकोस, मी मोबाइल देणार नाही,’ असे सांगत नकार दिला. त्यानंतर ते घरासमोरील अंगणात झोपण्यासाठी गेले.
वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून आरोपी बबलू घराबाहेर निघून गेला. मात्र, काही वेळाने तो पुन्हा घरी परतला. रागाच्या भरात त्याने चुलीजवळ ठेवलेली लोखंडी फुकारी हातात घेतली आणि अंगणात झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खंडू डोंबाळे यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सुरेखा खंडू डोंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे करत आहेत. दिवाळीच्या सणासुदीत मोबाईलसारख्या कारणावरून जन्मदात्याची हत्या झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








