मुंबई, 13 नोव्हेंबर: राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे निवडणूक लढवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. पक्षश्रेष्ठी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास आपण कोल्हापुरातून सतेज पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवू आणि त्यांचा नक्कीच पराभव करू, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सध्या महायुती आणि सतेज पाटील यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यातूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून कोल्हापुरातून कोणत्याही मतदारसंघातून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवावी, असे आव्हान सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले होते. यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांवर जोरदार पलटवार केला.
“सतेज पाटील मला सांगणारे कोण? माझा पक्ष जो सांगेल ते मी करतो,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. आपण कोल्हापुरातून पळून गेलो नसल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले की, अमित शाह यांच्या आदेशानंतरच आपण पुण्यात जाऊन निवडणूक लढलो आणि जिंकलो. “माझे पाकीट कोरे आहे, पक्षाने पत्ता टाकावा, मी तिकडे जातो,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. केवळ डिवचल्यामुळे आपण काहीही करणार नसून सतेज पाटलांनी त्यांना जिथे लढायचे तिथे लढावे, असेही ते म्हणाले.
आयुष्यात आपण कधीही निवडणूक हरलो नसल्याचा दावा करत पाटील म्हणाले की, “मला पक्षाने आदेश दिला आणि त्यांचे आव्हान स्वीकारायला सांगितले तर मी ते घेणार. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर मी सतेज पाटलांना हरवणार.” गोकुळच्या अध्यक्ष निवडीनंतर, देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर आपण सतेज पाटील यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करू, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी पूर्वी केले होते. त्यानंतरच सतेज पाटलांनी त्यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ
- उस्मान ख्वाजाच्या ‘सँडपेपरगेट’ दाव्यांवर पॅट कमिन्सने सोडले मौन; आरोप ‘पूर्णपणे बकवास’ असल्याचे मत
- रोहित शर्मा आणि इशान किशनच्या चुकीमुळे विल यंगला दोन जीवदान, आकिब नबी संतापला








