मुंबई, 13 नोव्हेंबर: कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरु असलेला संघर्ष आता राज्याच्या राजकारणातही तापला आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला असून, त्यांना कायद्यानेच वेसण घालणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच खासगी शिक्षण संस्थांच्या मनमानी फी वसुलीला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच कायदा आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोललेले आपण खपवून घेणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांचे साम्राज्य अवघ्या पाच मिनिटांत उद्ध्वस्त करू, या आपल्या जुन्या वक्तव्याचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचा संचालक बसल्यानंतर त्यांनी सतेज पाटलांवर ही जाहीर टीका केली होती.
शिक्षण संस्थाचालकांची झोप आपण नाही तर सुप्रीम कोर्टाने उडवली असल्याचे पाटील यांनी सांगितले. एका विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने मोठी प्रश्नावली दिली असून, दिवाळीनंतर त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठ चालकांची झोप नक्की उडणार आहे. याव्यतिरिक्त, एफआरए (FRA) कायद्याची अंमलबजावणी रोखण्यासाठी सतेज पाटील मुख्यमंत्र्यांना सातत्याने भेटत असल्याचा दावाही त्यांनी केला.
येत्या मार्च महिन्यात सरकार एफआरए कायदा आणणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर सरकारचे नियंत्रण राहील आणि मनमानी वसुली करणाऱ्यांवर कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा सातबारा तपासा, तो कोणाच्या नावावर आहे हे समोर येईल, असा सूचक इशाराही त्यांनी सतेज पाटलांना दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- फोन टॅपिंगचे आरोप निराधार अन् बालिश; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात
- एल निनोचा प्रभाव: यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडणार का? हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी नवा अलर्ट
- करुणा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा








