प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या खळबळजनक दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राहुल गांधी हे ‘फोन टॅपिंग’सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करत असल्याचा घणाघात शिंदे यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून आपला फोन टॅप केला जात असून, त्याचे सर्व पुरावे आपल्या फोनमध्ये असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला होता. गांधी यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या आरोपांचा समाचार घेताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ असा टोला लगावत शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने पछाडले आहे. जोपर्यंत ते पंतप्रधानांचे नाव घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची बातमी होत नाही आणि ते माध्यमांच्या चर्चेतही टिकू शकत नाहीत. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठीच ते असे दावे करत आहेत.
कोणताही ठोस मुद्दा, विकासाचे व्हिजन नसताना केवळ खिशात पुरावे असल्याच्या पोकळ बाता मारणे, हवेत तीर सोडणे आणि रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचणे, हा राहुल गांधींचा आता ‘फुल-टाइम’ उद्योग झाल्याची बोचरी टीका शिंदे यांनी केली. एकीकडे देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रगती करत असताना, विरोधी पक्षनेते मात्र अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःचे हसे करून घेत असल्याचेही ते म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- एल निनोचा प्रभाव: यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडणार का? हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी नवा अलर्ट
- करुणा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा
- १६ नोव्हेंबरला नवे चक्रीवादळ धडकणार; हवामान विभागाकडून अनेक राज्यांना अलर्ट जारी








