मुंबई, 13 नोव्हेंबर: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपावरून हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हा केवळ आरोप नसून ती एक वस्तुस्थिती आहे. पेगासस काही लोकांच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल केले गेले होते. अगदी भाजपच्या दिवंगत नेत्यांच्या मोबाईलमध्येही त्याचा वापर झाला होता, मात्र तेव्हा ते प्रकरण दाबण्यात आले. यासोबतच एप्सिटीन फाईलही दाबली गेली, असा दावा करत भाजप कायम खोट्याचीच पाठराखण करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली.
खासदार संजय राऊत यांनीही या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केले. मोदी-शाहांच्या राज्यात यापेक्षा दुसरं काय घडणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फोन टॅपिंगचे उद्योग करणारे नेतान्याहू असोत की निक्सन, ते सर्वजण पराभूत होऊन राजकारणातून हद्दपार झाले. मोदींच्या राजकारणालाही आता घरघर लागली असून, त्यांची सत्ता जाण्याच्या मार्गावर नसून ती आधीच गेली आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
सपकाळ यांनी देशातील वाढत्या महागाईसाठी सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरले. मोबाईलचा रिचार्ज, भाजीपाला आणि गॅसचे दर वाढत असून हे सर्व बाहेरून नियंत्रित केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. इंधनावरील करांचा सरकार विचार करत नाही. सरकार महागाई नियंत्रणात आणण्याऐवजी केवळ मागणी आणि पुरवठ्याचा खेळ खेळत असून, आगामी काळात या महागाईचा आणखी भडका उडेल, अशी भीती सपकाळ यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एका युझरच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींवर आपला फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. आपल्या फोनकडे बोट दाखवत सर्व पुरावे यातच असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान ज्या दिवशी समोरासमोर चर्चेला तयार होतील, तेव्हा परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली कोण आहे हे सर्वांना समजेल. तसेच, पंतप्रधान किती काळापासून देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत, याची इतर माहितीही आपण उघड करू, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचे फोन टॅपिंगचे आरोप सत्य, ‘वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र…’ नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
- फोन टॅपिंगचे आरोप निराधार अन् बालिश; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात
- एल निनोचा प्रभाव: यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडणार का? हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी नवा अलर्ट








