मुंबई, 14 नोव्हेंबर: मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर छठपूजेस उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतर आणि काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याच्या घटनांमधून नवा वाद उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर थेट हल्लाबोल केला आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजप जाणीवपूर्वक मुंबई व महाराष्ट्रात छठपूजेचा मुद्दा वापरून भाषिक आणि सांस्कृतिक संघर्ष पेटवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला. मनसेने रेल्वे स्थानकांवरील गाणी बंद पाडल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
निवडणुका जिंकण्यासाठी ‘फोडा आणि राज्य करा’ हे भाजपचे जुने सूत्र आता चालणार नाही, असे सांगत त्यांनी भाजपच्या थिंक टँकवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत बुरखा घातलेल्या व्यक्तींना मैदानांत फिरवून हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो, ज्यामध्ये अनेकदा हिंदू स्त्री-पुरुषच बुरखे घालून दहशत निर्माण करत असल्याचे व्हिडिओ समोर येतात, असा दावा त्यांनी केला. तसेच मागील वर्षी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला गेल्याचे ते म्हणाले. कामे दाखवून निवडणुका जिंकता येत नसल्याने दोन गटांत संघर्ष घडवून, सांडलेल्या रक्तावर भाजप विजयाचा देखावा उभा करत असून, खरे काम निवडणूक आयोगच करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
‘जेन झी’ (Gen Z) आंदोलनापासून भाजपचा केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेतून पायउतार होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. सत्ता गेल्यावर मागील १२-१४ वर्षांतील कर्मांची भुते मानगुटीवर बसतील, या भीतीने भाजप आणि त्यांचे पालक बिथरल्याचे राज ठाकरे म्हणाले. केंद्रीय आदेशाने एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या मर्जीतल्या लोकांना जंगले, जमिनी व सह्याद्री विकून महाराष्ट्र ओरबाडण्याचे काम सध्या सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मराठी माणसाने यापुढे बेसावध न राहता हा सर्व प्रकार लक्षात ठेवावा आणि योग्य वेळी राग व्यक्त केल्यावरच शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आपल्याला मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच, तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत, हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी व राज्याचे सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे,” असा थेट इशारा त्यांनी दिला. उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाने भाजपच्या स्वार्थासाठी बळी पडून आमच्या अंगावर येऊ नये, कारण इथे ‘मरहट्टे’ राहतात, असेही ते म्हणाले. मराठी माणसांनी शिवरायांचा गनिमी कावा वापरून भाजपच्या सापळ्यात न अडकता सतर्क राहावे, आपण योग्य वेळी निर्णय घेऊ, असे आवाहन त्यांनी केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








