प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे. छठपूजेच्या मुद्द्याचा वापर करून भाजप महाराष्ट्रात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण यापुढे चालणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, मराठी माणसांनी भाजपच्या या सापळ्यात अजिबात अडकू नये आणि सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज ठाकरे यांनी नमूद केले की, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया छठपूजेचा मुद्दा वापरून वाद पेटवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. यासाठी सांस्कृतिक आक्रमणाच्या रिल्स सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरही भोजपुरी गाणी वाजवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र मनसेने तो हाणून पाडल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपने अपेक्षित धरलेला संघर्ष राज्यात अद्याप उभा राहत नसल्याची खंत त्यांना आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सर्व आटापिटा सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. भाजपची बौद्धिक क्षमता आता कमकुवत झाली असून, कामे दाखवून त्यांना निवडणुका जिंकता येत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मी स्त्री नाही’, AISA नेत्या नेहा बोरा यांचा मोठा खुलासा; स्वतःची ओळख ‘नॉन-बायनरी’ म्हणून केली स्पष्ट
- सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
- दोन्ही शिवसेना एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चेवर मंत्री उदय सामंत यांचे थेट उत्तर







