राज ठाकरे यांचा भाजपला खणखणीत इशारा; ‘हा महाराष्ट्र आहे, इथे मरहट्टे राहतात!’

छठ पूजेच्या वादावरून राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली असून, ‘हा महाराष्ट्र आहे, इथे मरहट्टे राहतात,’ असा इशारा दिला आहे.

Published On: 

Raj Thackeray Speech: 'तुला त्याच खड्ड्यात उभा करून मारेन'; राज यांचा इशारा

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठ पूजेची गाणी वाजवल्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला खणखणीत इशारा दिला आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. भाजपने देशाची वाट लावली असून, आता महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सांस्कृतिक आक्रमण आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘हा महाराष्ट्र आहे, येथे मरहट्टे राहतात,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ठणकावून सांगत, मराठी माणसांनी भाजपच्या या सापळ्यात अडकू नये, असे आवाहन केले.

काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याने खळबळ उडाली होती, जी मनसेने बंद पाडली. यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, भाजप आणि त्यांचा ‘विषारी’ सोशल मीडिया छठ पूजेचा वापर करून महाराष्ट्रात वाद पेटवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर या पूजेच्या आणि सांस्कृतिक आक्रमणाच्या रील्स टाकल्या जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या स्वार्थासाठी हा सगळा खटाटोप सुरू असून, अपेक्षित संघर्ष उभा राहत नसल्याने भाजपला खंत वाटत असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजपच्या बौद्धिक थिंक टँकची क्षमता कमकुवत झाल्याचा टोला लगावत राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणावर निशाणा साधला. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून लोकसभेवेळी मैदानांत बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून हिंदू-मुस्लिम वाद पेटवला गेला. तर, मुंबई महापालिकेच्या वेळी कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःच्या कामावर नव्हे, तर दोन गटांत संघर्ष घडवून सांडलेल्या रक्तावर भाजप निवडणुका जिंकत असल्याचे ते म्हणाले. अर्थात, खरा विजय निवडणूक आयोगच मिळवून देतो, पण विजयाचे खापर फोडायला हे संघर्ष उपयोगी पडतात, असा उपरोधिक चिमटाही त्यांनी काढला.

‘जेन झी’ आंदोलनापासून भाजपच्या सत्तेतून पायउतार होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, गेल्या १२-१४ वर्षांतील कर्मांची भुते मानगुटीवर बसण्याच्या भीतीने ते बिथरल्याचे मनसे अध्यक्षांनी म्हटले आहे. दुसरीकडे, केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राची जंगले, जमिनी आणि सह्याद्री एकाच उद्योगपतीच्या आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांच्या घशात घातला जात असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. मराठी समाज हा देशातील सर्वात बेसावध समाज असून, त्यांनी या घटना विसरता कामा नये. शिवाजी महाराजांचा ‘गनिमी कावा’ वापरून आपण कधी व कसे उत्तर द्यायचे हे ठरवू, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पूजेच्या नावाखाली कोणी सांस्कृतिक उन्माद घातल्यास आपण शांत आहोत म्हणजे भित्रे (गांडू) नाही, हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा सज्जड दम राज यांनी दिला आहे. उत्तर भारतीय आणि गुजराती समाजालाही भाजपकडून केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वापरले जात असल्याचे सांगत, त्यांनी मराठी माणसांच्या अंगावर आल्यास गाठ मरहट्ट्यांशी आहे, याची आठवण करून दिली. तसेच, जाती-धर्मात वाद लावण्यापेक्षा भाजपने काहीतरी नवीन शोधावे आणि मनसैनिकांनी सतर्क राहून योग्य वेळी निर्णय घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही