‘राज ठाकरे, छठ मातेला नमन करा!’, छठपूजेला विरोधावरून गुणरत्न सदावर्तेंचा मनसेवर घणाघात

मुंबईत छठपूजेला मनसेने केलेल्या विरोधानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी राज ठाकरे आणि सयाजी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published On: 

Gunratna Sadavarte Criticized MNS Raj Thackeray 

मुंबई, 14 नोव्हेंबर: मुंबईत रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याला आणि छठ पूजेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विरोधानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आपापल्या श्रद्धा आणि परंपरांनुसार जगण्याचा अबाधित अधिकार दिला असून, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे सदावर्ते यांनी स्पष्ट केले. आईला माय, मदर किंवा अम्मा म्हटले तरी ती आईच असते, त्यामुळे भाषेच्या नावावर वाद निर्माण करणे ही अत्यंत विचलित आणि फ्रस्ट्रेशनची मानसिकता असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

छठ माता आणि माता लक्ष्मी या दोन्ही हिंदूंच्या श्रद्धेच्या देवता असल्याचे सांगत सदावर्तेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केले. मनसेकडून हिंदूंच्या पूजेला विरोध होत असल्याबद्दल संताप व्यक्त करत, ‘तुम्ही आहात तरी कोण आणि हे अक्षम्य आहे,’ असा थेट सवाल त्यांनी विचारला. या श्रद्धा वेगवेगळ्या नसून एकच आहेत, हे न समजणे म्हणजे राज ठाकरेंच्या विचारांची दिवाळखोरी आणि उन्हाळा असल्याचे सदावर्ते म्हणाले. तसेच, राज ठाकरेंच्या या भूमिकेशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का, केवळ बोलघेवडेपणा चालला आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.

कोणामध्येही छठ पूजा रोखण्याची हिंमत नसून, ती मुंबई आणि उल्हास नदीवर पूर्वीप्रमाणेच होईल, असे खुले आव्हान सदावर्तेंनी दिले. बिहार ही भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि सीतामाई यांची पावनभूमी असून, याच भूमीने देशाला जगभरात शांतीचा संदेश दिला आहे. असे असतानाही मनसेकडून केवळ घाणेरड्या राजकारणासाठी गुंडगिरी केली जात असून, तुमची संसदीय लायकी काय आहे, असा घणाघात त्यांनी केला.

याच मुद्द्यावरून सदावर्ते यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचाही एकेरी उल्लेख करत समाचार घेतला. केवळ वृक्षप्रेमाच्या नावाखाली साधुसंतांबद्दल आणि कुंभमेळ्याविषयी वेडेवाकडे बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा संतप्त सवाल त्यांनी केला. सयाजी शिंदे स्वतःला साधुसंतांपेक्षा मोठे समजतात का, असे विचारत त्यांनी याप्रकरणी शिंदेंनी तातडीने माफी मागण्याची मागणी केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत सदावर्ते म्हणाले की, न्यायालयाने दोन ओळींत केवळ विहित ठिकाणी परवानगीसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. मात्र, वैयक्तिक पातळीवर वांद्रे किंवा कोणत्याही चौपाटीवर जाऊन नतमस्तक होण्यापासून कुणालाही रोखता येणार नाही. त्यासाठी या निर्णयाला आव्हान द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही बालिश गुंडांनी छठ मातेच्या भक्तांचा केसही वाकडा करण्याचा प्रयत्न करू नये, असा थेट इशारा त्यांनी दिला.

राज ठाकरेंनी आपल्या पूर्वजांची आठवण ठेवावी आणि स्वतः छठ मातेला नमन करावे, अन्यथा ते हिंदी-विरोधी ठरतील, असे सदावर्ते म्हणाले. बिहारमुळे देशाचे नाव जगभरात असून, ऑस्ट्रेलियासह जगभरात सध्या छठ पूजा साजरी केली जात आहे. त्यामुळे नाशिकचा कुंभ असो किंवा मुंबईची छठ पूजा, याला कोणीही रोखू शकत नाही. हा देश छठ पूजा करणाऱ्यांचा आहे आणि राहील असे सांगतानाच, हिंदूविरोधी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध सर्व पिठांच्या साधुसंतांनी एकत्र उभे राहावे, असे आवाहन सदावर्तेंनी केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही