मुंबई, 14 नोव्हेंबर: बदलते हवामान, वाढते प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे त्वचेसोबतच केसांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. यामुळे केस गळणे, कोरडे पडणे आणि कोंड्याचा त्रास यांसारख्या समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांवर जास्वंदाचे तेल हा एक उत्तम उपाय आहे. ‘जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजी’मधील एका अभ्यासानुसार, टक्कल पडण्यासारख्या समस्येवरही जास्वंदाचे तेल अत्यंत गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.
हे फायदेशीर तेल घरच्या घरी सहज तयार करता येते. यासाठी ८-१० जास्वंदाची फुले, ८-१० जास्वंदाची पाने आणि एक वाटी खोबरेल तेल लागते. खोबरेल तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेलही वापरता येते. तेल बनवण्यासाठी सर्वात आधी जास्वंदाची फुले आणि पाने चोवीस तास उन्हात किंवा पंख्याच्या हवेखाली वाळवून घ्या. त्यानंतर ही वाळलेली फुले आणि पाने मिक्सरमध्ये वाटून त्याची अगदी बारीक पावडर तयार करा.
पावडर तयार झाल्यानंतर गॅसवर एका भांड्यात एक वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तयार केलेली जास्वंदाची पावडर मिसळा. जास्वंदाचे सर्व गुणधर्म तेलात व्यवस्थित उतरावेत, यासाठी हे मिश्रण मंद आचेवर किमान दहा मिनिटे गरम होऊ द्या. तेल पूर्णपणे थंड झाल्यावर ते गाळून एका बाटलीत भरून ठेवा.
जास्वंदाचे हे तेल लावण्यासाठी एका वाटीत दोन मोठे चमचे तेल घ्या आणि कापसाच्या मदतीने ते टाळूवर केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर बोटांनी हलक्या हाताने पाच ते सहा मिनिटे मालिश करा. हे तेल साधारण पाऊण तास केसांना लावून ठेवा आणि नंतर एखाद्या सौम्य शॅम्पूने केस धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून एकदा, शक्यतो केस धुण्याच्या आदल्या रात्री हे तेल लावण्याचा सल्ला दिला जातो.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








