Gautami Patil | “तू मनोरंजन क्षेत्रातील ‘पाटलीण’ आहेस, रुबाबात नाच…”; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या तिच्या आडनावावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गौतमीने ‘पाटील’ आडनाव बदलावं अन्यथा तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा संघटनेने घेतली आहे. तर मी ‘पाटील’ आहे तर पाटीलच आडनाव लावणार अशी कणखर बाजू गौतमीने मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी पोस्ट केली आहे.

Special post by Kiran Mane for Gautami Patil

अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी गौतमी (Gautami Patil) च्या समर्थनासाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी गौतमीचे प्रचंड कौतुक केले आहे. तू मनोरंजन क्षेत्रातील ‘पाटलीण’आहेस, तू रुबाबात आणि बिंदास नाच, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

किरण माने यांची फेसबुक पोस्ट (Facebook post by Kiran Mane)

…”एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे…” गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगीतलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.

चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे… आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं… कसं वागायचं… स्वत:च्या घरात काय खायचं… कसले कपडे घालायचे… यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच… पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल… धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.

गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस… पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता ‘बिभत्स’ असं काहीही नाही. परफाॅर्मन्स करताना अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे… पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त ‘क्रेझ’ आहे.. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टाॅपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पाॅप्यूलर आहेस. तू हे यश एंजाॅय कर. बर्याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण ‘आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस’ असं दरडावू पहाणार्यांना उंच उंच लांब उडवून लाव.

आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ हायेस… रुबाबात नाच, बिनधास्त नाच ! ❤️

– किरण माने.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.