Eknath Shinde | “आम्ही बंड केलेलं नाही, तर आम्ही उठावच केला”; शिंदे गटाच्या खासदाराचं वक्तव्य

Shivsena | मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. शिवसेनेच्या ‘पक्ष’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्याप्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटाने आपले लेखी म्हणणे निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. युक्तावाद सादर केल्यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

“आम्ही बंड केलेलं नाही, तर आम्ही उठावच केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचाच उठाव केला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि आमदारांच्या मनात ही भावना होती. ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलो त्यावरून आम्ही हा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने काय म्हटलं आहे ते त्यांना वाटत असेल ते म्हणत आहेत. कुठलाही उठाव हा एका दिवसात, एका रात्रीत होत नाही. मतदारांनी जो कौल दिला त्याविरोधात आघाडी करण्यात आली होती. तसंच विविध घटना पुढे घडल्या त्यामुळे आम्ही उठाव केला”, असे राहुल शेवाळे म्हणाले आहेत.

‘बाळासाहेबांची शिवसेना ही योग्य मार्गावर’

“बाळासाहेबांची शिवसेना ही योग्य मार्गावर आहे. अरविंद सावंत यांना दोन घटना आहेत हे माहित नसेल. उद्धव ठाकरेंनी वेगळी घटना तयार केली होती. ही घटना जेव्हा तयार केली गेली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. एखादं बंड किंवा उठाव होतो तो काही एका दिवसात होत नाही. शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. आम्ही सगळे निवडणून आलो होतो. पण महाविकास आघाडी निर्माण झाली त्यानंतर शिवसेनेतल्या आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना डावललं गेलं. अनेक गोष्टी अन्यायकारक घडल्या त्यामुळे आम्ही हा उठाव केला” असे राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे.

“मतदारांनी जो आम्हाला आशीर्वाद दिला त्याचा सन्मान ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत पक्ष नेतृत्त्वाकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांच्या विरोधात हा उठाव करण्यात आला आहे” असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.